महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या मोर्चाला परवानगी नाही, मुंबई पोलिसांचा निर्णय
तर 23 जानेवारीला राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी अधिवेशनातच त्यांनी 9 फेब्रुवारीला होणाऱ्या मोर्चाची घोषणा केली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात बदल केला. तर 23 जानेवारीला राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी अधिवेशनातच त्यांनी 9 फेब्रुवारीला होणाऱ्या मोर्चाची घोषणा केली होती. हा मोर्चा घुसखोरांच्या विरोधातील मुद्द्यावरुन असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी या मोर्चाचा मार्ग गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा होता. मात्र मुंबई पोलिसांनी या मार्गाने मोर्चा काढण्यास मनाई करत मार्गात बदल करुन दिला. बदलेल्या मार्गानुसार मरिन लाईन्स ते आझाद मैदान असा मोर्चा होता. परंतु आता मुंबई पोलिसांनी मोर्चाला पूर्णपणे परवानगी नाकारली आहे. दक्षिण मुंबईतील भागात मोर्चे काढण्यास मनाई असून तो संवेदनशील आणि गजबजलेला भाग असल्याने तेथे मोर्चा काढू शकत नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
न्यूज 18 लोकमत यांनी अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी फक्त आझाद मैदानात सभा घेण्याचे निर्देशन राज ठाकरे यांना दिले आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या या निर्णयामुळे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मनसेने बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांची हकालपट्टी करा अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. तर मोर्चापूर्वी पोलिसांनी मनसैनिकांना नोटिसा सुद्धा पाठवल्या आहेत.(हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेकडून शिवसेनेची कोंडी, मातोश्री बाहेर झळकावले पोस्टर)
तर देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं मत राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात व्यक्त केले होते. तसेच मनेसेच्या मोर्चाला परवानगी देण्याच्या मुद्द्यावर स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती.