लॉकडाऊनमध्ये विनाकारण प्रवास करणाऱ्या नागरिकांवर मुंबई पोलिसांची कारवाई; दिवसभरात तब्बल 16 हजार वाहने जप्त

दरम्यान, वाहनांच्या, पादचाऱ्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नव्या नियमांची अंबलबजावणी केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

लॉकडाऊन (Lockdown) शिथिल झाल्यापासून मुंबईतील (Mumbai) रस्त्यांवर काही नागरिक विनाकारण गर्दी कारण करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, वाहनांच्या, पादचाऱ्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नव्या नियमांची अंबलबजावणी केली आहे. रहिवास क्षेत्राच्या दोन किलोमीटर परिघाबाहेर मुक्त संचार करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी विनाकारण प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 16 हजार वाहने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात दिली आहे.

नव्या निर्देशानुसार, ऑफिस आणि अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घरापासून दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर विनाकारण प्रवास करताना आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी पोलिसांनी कोणालाही सोडले नाही. कोणी रक्त चाचणीसाठी, किराणा सामान आणण्यासाठी किंवा बीपीओमध्ये कामावर जाण्यासाठी निघाले असले, तरी त्यांची वाहन तपासणी केली. जवळपास 38 हजार गाडयांची तपासणी करण्यात आली आहे. ज्यामुळे सोमवारी सकाळी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.दरम्यान, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गोगलगायीच्या गतीने वाहने पुढे सरकत होती. त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले आहेत. हे देखील वाचा- Mission Begin Again 2: महाराष्ट्रात 1 जुलैपासून 'मिशन बिगीन अगेन'च्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; राज्यात नेमके काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून

पोलिसांच्या या तपासणी मोहिमेत दुचाकीस्वार सोपे लक्ष्य ठरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण गाड्यापैकी 72 टक्के दुचाकीचा समावेश आहे. यामुळे पोलिसांच्या या कारवाईवर दुचाकीस्वारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारीदेखील मोलाचा वाटा उचलत आहेत.