Mumbai: पोलिसांकडून ATM मधून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शहरातील विविध बँकांची 21 वेळा फसवणूक (Watch)
आता पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
मुंबईच्या (Mumbai) बोरीवली (Borivali) भागातील एमएचबी कॉलनी पोलिसांनी एकूण 21 बँकांच्या ऑटोमेटेड टेलर मशीनमधून (ATM) चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मुंबईतील विविध भागातील एटीएममधून चोरी करणारी ही टोळी उत्तर प्रदेशातील प्रतापगडची आहे. त्यांना ठाण्यातील कळवा येथून अटक करण्यात आली. धीरेंद्रकुमार रामदेव पाल (22) आणि अभिषेक रामाजोर यादव (22) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील कुंडा गावचे रहिवासी आहेत.
बोरीवली येथील बीसीसी बँकेच्या अधिकाऱ्याने त्यांच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवल्यानंतर एमएचबी पोलिसांन 8 मार्च रोजी एफआयआर नोंदवला होता. मात्र, गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना असे आढळून आले की, हे गुन्हे एका चोरीपुरते मर्यादित नसून, आर्थिक राजधानीत अशाच प्रकारच्या एकूण 21 गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग आहे. आरोपींना अटक केल्यानंतर, पोलिसांनी घटनांबद्दल वर्णन करणारे निवेदन जारी केले.
माहितीनुसार, बोरीवली पश्चिम येथील भगवती हॉस्पिटलजवळील बसीन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या एटीएममध्ये 5 मार्च रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला आणि स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने मशीनमध्ये छेडछाड केली. त्यानंतर काही वेळ ते एटीएम रूमच्या बाहेर थांबले, त्यादरम्यान एक बँक एटीममधून पैसे काढण्यास आला, मात्र त्याचे पैसे मशिनमधून न निघाल्याने तो निघून गेला आणि नंतर या दोन संशयितांनी आत प्रवेश केला. (हेही वाचा: पालघर मध्ये मुलं चोरायची टोळी समजून 2 साधूंना ठेवलं बांधून; पोलिसांनी हस्तक्षेप करत केली सुटका)
त्यांनी हाताने आणि मोबाईल टॉर्चचा वापर करून कॅश डिस्पेन्सरचा बेल्ट बाहेर काढला त्यानंतर, त्यांनी एटीएम मशीनचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. आता पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.