Mumbai Pod Taxi: मुंबईकरांसाठी खुशखबर! वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान BKC मधून धावणार ‘पॉड टॅक्सी’; जाणून घ्या काय आहे संकल्पना

ही पॉड टॅक्सी कुर्ला रेल्वे स्थानकावरून मिठी नदी ओलांडून, बीकेसीच्या जी ब्लॉकमधून, ई-ब्लॉकच्या प्रमुख संस्थांजवळून, कलानगरला पोहोचेल आणि नंतर पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर जाईल.

Mumbai Pod Taxi

Mumbai Pod Taxi: मुंबईमधील कुर्ला ते वांद्रे (Bandra-Kurla) दरम्यानची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. या मार्गावर अत्यंत मर्यादित जागा असल्याने प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जलद पोहोचण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ (Pod Taxi) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत अनेक महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चर्चा झाली व काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान वांद्रे–कुर्ला संकुलामधून ‘पॉड टॅक्सी’ धावणार असून, त्याची लांबी 8.80 कीमी एवढी आहे. त्यामध्ये 38 स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल 40 किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे, हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

पॉड टॅक्सीसाठी कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान जमिनीपासून 25 ते 30 मीटर अंतरावर एक विशेष मार्ग तयार केला जाईल. पॉड टॅक्सी चालवण्यासाठी कुर्ला ते वांद्रे दरम्यान एक उन्नत मार्ग तयार केला जाईल. प्रवाशांसाठी दर काही मिनिटांनी एअर टॅक्सी सेवा उपलब्ध असेल. यातील सहा प्रवासी पूर्ण टॅक्सी बुक करू शकतात आणि कोणत्याही मध्यवर्ती स्थानकावर न थांबता त्यांचा प्रवास पूर्ण करू शकतात.

ही पॉड टॅक्सी कुर्ला रेल्वे स्थानकावरून मिठी नदी ओलांडून, बीकेसीच्या जी ब्लॉकमधून, ई-ब्लॉकच्या प्रमुख संस्थांजवळून, कलानगरला पोहोचेल आणि नंतर पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर जाईल. बीकेसी हे मुंबईचे आर्थिक केंद्र आहे. अनेक मोठ्या देशी-विदेशी कंपन्या आणि बँकांची मुख्यालये बीकेसीमध्ये आहेत. बीकेसीमध्ये दररोज हजारो लोक कामानिमित्त येतात. त्यामुळे या प्रकल्पाद्वारे अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता यावा म्हणून ही टॅक्सी अनेक महत्वाच्या ठिकाणावर थांबेल. पॉड टॅक्सी सुरू झाल्यामुळे लोकांना कोंडी आणि रहदारीपासून दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास आहे. (हेही वाचा: Vande Bharat Express: प्रवाशांना दिलासा! लवकरच सुरु होणार मुंबई-कोल्हापूर आणि पुणे-वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, पॉड टॅक्सी ही लहान स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहने आहेत, जी उर्जेच्या मदतीने चालतात. ही पूर्णपणे स्वयंचलित टॅक्सी असणार आहे, ज्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही. पॉड टॅक्सी स्वयंचलित, पर्यावरणास अनुकूल वाहने आहेत जी रस्त्यावरील रहदारी टाळण्यासाठी स्वतंत्र ट्रॅकवर धावतात. वेगळ्या ट्रॅकमुळे पॉड टॅक्सी ट्रॅफिकमध्ये न अडकता जास्त वेगाने प्रवास करू शकतात.