Mumbai: कोरोनाची लस घेतल्यानंतर नागरिकांना सर्टिफिकेट मिळणे मुश्किल, Co-Win अॅपमध्ये तांत्रिक समस्या येत असल्याने केंद्रावर गोंधळ
कारण कोविन (Co-Win) अॅपमध्ये तांत्रिक समस्या येत असल्याने लसीकरण केंद्रात नागरिकांना लसीचा डोस घेतल्याचे सर्टिफिकेट दिले जात नाही आहे.
Mumbai: कोरोना व्हायरसवरील लसीचा डोस घेण्यासाठी पोहचलेल्या नागरिकांना त्याचे सर्टिफिकेट मिळणे मुश्किल होत आहे. कारण कोविन (Co-Win) अॅपमध्ये तांत्रिक समस्या येत असल्याने लसीकरण केंद्रात नागरिकांना लसीचा डोस घेतल्याचे सर्टिफिकेट दिले जात नाही आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रात गोंधळ उडाला असून नागरिकांनी सर्टिफिकेट अॅपवरुन डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला जात आहे.(Covishield चे आज सकाळी 99,000 डोस मिळाले असून सरकारी हॉस्पिटलच्या वॅक्सिन सेंटर मध्ये पाठवले जातील - BMC ची माहिती)
बीकेसी येथे काम करणाऱ्या मंजीबाई पटेल यांनी कोरोनाचा पहिला डोस घेण्यासाठी केंद्रावरच रजिस्ट्रेशन केले आणि तो घेतला. मात्र रजिस्ट्रर केल्याचा किंवा लस घेतल्याचा कोणताच मेसेज त्यांना आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर लस घेतल्याचे सर्टिफिकेट नसल्यास इमारतीत राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार प्रवेश करता येणार नाही असे त्यांनी म्हटले. काही लसीकरण केंद्रांनी टाईम्स ऑफ इंडिया यांना असे सांगितले की, सध्या कोविन अॅपमध्ये काही तांत्रिक समस्या येत आहे. काही वेळेस नागरिकांना दोन्ही लसीचे डोस घेतल्यानंतर सर्टिफिकेट मिळते. मात्र काही वेळेस सर्टिफिकेट सुद्धा डाऊनलोड केलेले नसते असे केंद्रावरील डेटा एन्ट्री करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. काही प्रकरणात असे समोर आले आहे की, फोन क्रमांक सुद्धा चुकीचे दिले गेले आहेत.('महाराष्ट्राला आठवड्याभरात लसींचा पुरवठा वाढवला नाही तर SII कडून होणारी लस वाहतूक थांबवू'; राजू शेट्टी यांचा पत्राद्वारे केंद्राला इशारा)
दरम्यान, कोरोना लसीचा पुरवठा अपुरा पडू लागल्याने आता खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे येत्या सोमवार पर्यंत बंद राहणार आहेत. फक्त शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरण सुरु राहिल अशी माहिती महापालिकेने ट्विट करत दिली आहे. ही स्थिती फक्त मुंबई पुरतीच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात लसीचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे लसीचा डोस घेण्यासाठी पोहचलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे बोर्ड लावल्याने परत माघारी यावे लागत आहेत. त्याचसोबत बहुतांश जणांचा कोरोनाचा दुसरा डोस सुद्धा सध्या मिळणे मुश्किल झाले आहे.