मुंबईमध्ये ओला उबर चालकांची पुन्हा एकदा संपावर जाण्याची हाक
ओला उबेर टॅक्सी चालक आक्रमक झाले असून 17 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
मुंबईतील ओला उबरच्या चालकांनी यापूर्वी 22 ऑक्टोंबर रोजी संपाची हाक दिली होती. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतलेल्या बैठकीनंतर सलग बाराव्या दिवशी चालकांनी त्यांचा संप मागे घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा हे टॅक्सी चालक आक्रमक झाले असून 17 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
या संपासाठी ओला उबेरचे सर्व टॅक्सी चालक येत्या 19 नोव्हेंबर रोजी परेलपासून चालू होणारा मोर्चा थेट मंत्रालयापर्यंत घेऊन जाणार आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीचे भाडे हे 100 ते 150 रुपयांप्रमाणे ठेवून, प्रति लिटरसाठी 18 ते 23 रुपये भाडे करावे अशी मागणी या टॅक्सी चालकांनी केली आहे.
यापूर्वी ओला उबर यांनी पुकारलेल्या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून दिवाकर रावते यांनी एक बैठक घेतली होती. त्यानंतर हे चालक शांत झाले असताना आता पुन्हा टॅक्सीच्या भाड्यावरुन या वादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे ओला उबेर चालकांनी संपावर जाण्याचा इशारा सरकारला दिला आहे.