Mumbai: आता बँकही सुरक्षित नाही? लॉकरमधून तब्बल 12 लाख रुपयांचे दागिने गायब झाल्याचा महिलेचा दावा; तक्रार दाखल

2007 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर लॉकर पूर्णतः संपत यांच्या नावावर झाला.

Gold | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या (Mumbai) बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले 12 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार एका महिलेने गमदेवी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारदार, मिला संपत (57) या अंधेरी पूर्व येथील रहिवासी असून, त्यांचा महालक्ष्मी येथील भुलाभाई देसाई रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत लॉकर होता. त्यामध्ये त्यांनी मौल्यवान घड्याळे, सोने आणि हिऱ्यांचे दागिने ठेवले होते.

त्या वर्षातून एकदा लॉकर तपासत असत. माहितीनुसार, त्यांनी शेवटचे त्यांचा लॉकर जानेवारी 2020 मध्ये उघडला होता, तेव्हा त्यांचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने अबाधित होते.

मात्र त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे त्या पुढील दोन वर्ष लॉकरला भेट देऊ शकल्या नाहीत. त्यानंतर जून 2022 मध्ये त्या बँकेत लॉकर तपासण्यासाठी गेल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यांना अचानक वीज गेल्यामुळे परत येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये, त्यांना एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला ज्यात त्यांना आगामी बँकेच्या पुनर्स्थापनेबद्दल सूचित केले गेले आणि लॉकर त्वरित रिकामे करण्यास सांगितले.

त्यानंतर त्यांनी लॉकर तपासल्यानंतर सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी त्वरीत संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. बँकेच्या कारवाईच्या अभावामुळे निराश झालेल्या संपत यांनी गमदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Pandharpur Temples Act: पंढरपूर मंदिर कायद्याला सुब्रमण्यम स्वामींचे आव्हान; जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मागितले महाराष्ट्र सरकारकडून उत्तर)

हा लॉकर सुरुवातीला संपत यांच्या सासू आणि पतीच्या नावावर 1984 मध्ये नोंदवला गेला होता त्यानंतर संपत यांचे नाव जोडले गेले. 2007 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर लॉकर पूर्णतः संपत यांच्या नावावर झाला. बँकेच्या लॉकरमधून चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये मलबार हिल पोलीस ठाण्याने बँक कस्टोडियनला अटक केल्याच्या एका महिन्यानंतर ही घटना घडली आहे.