Mumbai: मुंबईतील जवळपास 60 टक्के अमराठी लोकांना महाराष्ट्रात कधीही वाईट वागणूक मिळाली नाही- सर्वेक्षणात खुलासा

बाहेरील लोकांचा मराठी भाषा आणि संस्कृतीला धोका आहे का, असे मराठी लोकांना विचारले असता, 58.3 टक्के लोकांनी सांगितले की, बाहेरील लोकांचा धोका नाही, तर 25 टक्के लोकांनी सांगितले की त्यांचा मोठ्या प्रमाणावर धोका आहे व 8.3 टक्के म्हणाले की राज्याला अशा लोकांचा काही प्रमाणात धोका आहे

Mumbai | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईत (Mumbai) राहणाऱ्या राज्यातील बाहेरच्या लोकांशी स्थानिक लोकांकडून भेदभाव केल्याच्या बातम्या अनेकदा येत असतात. विशेषत: यूपी आणि बिहारमधील लोकांना अशा समस्यांचा सामना करावा लागल्याची तक्रार बरेचवेळा कानावर आल्या आहेत. मात्र यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात काही वेगळेच निष्कर्ष समोर आले आहेत. सर्वेक्षणात सामील झालेल्या मुंबईतील सुमारे 60 टक्के गैर-मराठी लोकांनी सांगितले की, त्यांना स्थानिक मराठी लोकांकडून त्यांना कधीही वाईट वागणूक मिळाली नाही.

IANS-CVoter च्या या सर्वेक्षणानुसार, हा प्रश्न महाराष्ट्राबाहेर जन्मलेल्यांना विचारण्यात आला होता. प्रश्न असा होता की, तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला स्थानिक मराठी लोकांकडून कधी वाईट वागणूक मिळाली आहे का? सर्वेक्षणानुसार, 59.9 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना कधीही वाईट वागणूक दिली गेली नाही, तर 22.5 टक्के लोकांनी सांगितले की त्यांच्याशी कधीकधी गैरवर्तन झाले आणि 10.4 टक्के लोकांनी सांगितले की त्यांच्याशी अनेकदा गैरवर्तन केले गेले.

बाहेरील लोकांचा मराठी भाषा आणि संस्कृतीला धोका आहे का, असे मराठी लोकांना विचारले असता, 58.3 टक्के लोकांनी सांगितले की, बाहेरील लोकांचा धोका नाही, तर 25 टक्के लोकांनी सांगितले की त्यांचा मोठ्या प्रमाणावर धोका आहे व 8.3 टक्के म्हणाले की राज्याला अशा लोकांचा काही प्रमाणात धोका आहे. अशाप्रकारे 1 मे रोजी येणाऱ्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सी व्होटरने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणात शहरातील रहिवाशांनी धक्कादायक पसंती आणि मते व्यक्त केली.

अनेकांना राजकीय, सामाजिक आणि स्थानिक समस्यांबद्दल विचारण्यात आले. त्यातील एक प्रश्न होता- 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून मुंबईतील सर्वात प्रभावशाली राजकारणी कोण आहेत असे तुम्हाला वाटते? राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अध्यक्ष शरद पवार यांची निवड करावी, असे दिल्लीतील प्रसारमाध्यमांना वाटत असतानाच, दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सर्वात प्रभावी राजकारणी असल्याचे मुंबईतील रहिवाशांचे मत होते. (हेही वाचा: आंबेडकर, फुले यांच्यासारख्या सुधारकांचा उल्लेख मनसे का करत नाही, मंत्री छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल)

सर्वेक्षणातील सहभागी 46 टक्क्यांहून अधिक स्थानिक मराठींनी बाळासाहेब ठाकरे यांची निवड केली, तर 50 टक्क्यांहून अधिक अमराठींनी त्यांची निवड केली. याबाबत, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना मिळणाऱ्या विरोधकांच्या आव्हानाचे नेतृत्व करण्याची शक्यता असलेल्या शरद पवार यांना फार कमी मते मिळाली. केवळ 8.4 टक्के स्थानिक मराठींनी पवारांना निवडले, तर 4.5 टक्के बिगरमराठ्यांनी त्यांना निवडले.