मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे, संभाव्य कचराकोंडी टळली

त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. या नाराजीतूनच कामबंद आंदोलन आणि सोबतच संपाचे हात्यार सफाई कर्मचाऱ्यांनी उपसले होते.

मुंबईत कचऱ्याचे ढिग (Archived and representative images)

मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने शहरातील संभाव्य कचराकोंडी टळली. तसेच, घाण आणि दुर्गंधीपासून मुंबईकरांनाही दिलासा मिळाला. सफाई आणि कचरा उचलण्याच्या कामासाठी नियमित कार्मचाऱ्यांना डावलून कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. या नाराजीतूनच कामबंद आंदोलन आणि सोबतच संपाचे हात्यार सफाई कर्मचाऱ्यांनी उपसले होते. त्यामुळे हे कर्मचारी गेले चार दिवस आंदोलन करत होते.

दरम्यान, सर्व ‘नियमित’ कामगारांना ‘पदा’नुसार त्यांच्या विभागातच काम देण्याचे ठाम आश्वासन पालिका प्रशासनाने आंदोलक कर्मचाऱ्यांना दिले. त्यानंत कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. सफाई कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये मंगळवारपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले होते. तर, गुरुवारपासून मुलुंडमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले होते. पालिका प्रशासनाने कामगारांच्या आंदोलनाची दखलच घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी चौथ्या दिवशी संपूर्ण मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता. (हेही वाचा, मुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार)

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत समन्वय समिती, उपायुक्त विश्वास शंकरवार यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी कामगारांना त्यांच्या पदानुसार आणि विभागातच योग्य काम देईल असे आश्वासन प्रशासनाकडून दिले. यावेळी समन्वय समिती अध्यक्ष बाबा कदम, संजय वाघ, हेमंत कदम, महाबळ शेट्टी, सत्यवान जावकर, के. पी. नाईक, सुखदेव काशिद, अशोक जाधव आदी उपस्थित होते. सफाई कर्मचारी संपावर गेल्यामुळे राजधानी मुंबईत कचऱ्याचे ढिग साचल्याचे पाहायला मिळाले. कचरा उचलणारे सर्वच कामगार संपावर गेल्याने मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजेच २४ वॉर्डमध्ये कचऱ्यांचे थरच्या थर साचत होते.