Mumbai MNS Melava: मुंबई मध्ये मनसे चा मेळावा संपन्न; विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर पहिल्यांदा जाहीर बोलताना राज ठाकरे यांचा 'भाजपा' वर हल्लाबोल
भाजपा ने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते कसे काय निवडून येऊ शकतात आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवतात? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी विचारला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पराभवानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरे (Raj Thackeray) पदाधिकार्यांसमोर जाहीर भाषणासाठी समोर आले होते. या भाषणात त्यांनी विधानसभा निवडणूक निकालांवर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान आज मुंबईत मनसेचा मेळावा संपन्न झाला आहे. यावेळी पदाधिकार्यांना अपयशाने खचून न जाता खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी भाजपा वर हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणूकीत अनपेक्षित निकाल लागल्याचं ते म्हणाले आहेत. बाळासाहेब थोरात पराभूत, अजित पवारांचे 42 आमदार आणि अख्खं गाव ज्यांचं आहे त्या राजू पाटीलांना एकही मत नाही हे कसं शक्य आहे? असा सवाल आज राज ठाकरेंनी विचारला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी सर्वोच्च न्यायालयाची तारीख फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीला गेली आहे त्यामुळे आता या निवडणूका देखील ऑक्टोबर मध्ये जाण्याचा अंदाज राज ठाकरेंनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे अजूनही कामाला लागा, घराघरात पोहचा असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आचार संहिता येणार
मनसे मध्ये येत्या काही महिन्यांत शिस्त येण्यासाठी आचारसंहिता लागू केली जाणार आहे. यामुळे काही पदांची नावं बदलली जातील. पक्षात काय सुरू आहे हे कार्यकर्त्यालाही कळेल यासाठी हा प्रयत्न असणार आहे. आपण अनेक जय-पराजय पाहिले आहेत. त्यामुळे मनाने हरलेल्या, पिचलेल्यांचं आपण नेतृत्त्व करणार नाही असेही ते म्हणाले आहेत.
मनसे भूमिका बदलते वर प्रत्युत्तर
राज ठाकरे यांनी मनसे भूमिका बदलते हा काहींचा जाणीवपूर्वक प्रचार असल्याचं त्यांनी निक्षून सांगितलं आहे. पक्ष म्हणून आपण काय केलंय हे लोकांसमोर ठामपणे सांगता आलं पाहिजे असं यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकारी मेळाव्यात सांगितलं आहे. यासाठी तुमचा देखील अभ्यास असायला पाहिजे. पत्रकार हे पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत. तेच या गोष्टी सांगत असतात आणि लिहित असतात. चार लोकांनी प्रश्न विचारल्यावर भांबावून जाणं हे काही चांगलं लक्षण नव्हे. असे ते म्हणाले आहेत.
भाजपा वर हल्लाबोल
भाजपा ने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते कसे काय निवडून येऊ शकतात आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवतात? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी विचारला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

