दादर मार्केट येथे 10 रुपयांवरुन भाजी विक्रेत्याने ग्राहकावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मनसे आक्रमक
काही दिवसांपूर्वी दादर (Dadar) रेल्वेस्थानकाबाहेर रात्रीच्या वेळेस ग्राहक आणि भाजी विक्रेत्यामध्ये 10 रुपयांवरुन वादावादी झाली.
काही दिवसांपूर्वी दादर (Dadar) रेल्वेस्थानकाबाहेर रात्रीच्या वेळेस ग्राहक आणि भाजी विक्रेत्यामध्ये 10 रुपयांवरुन वादावादी झाली. या दोघांमधील वाद एवढा टोकाला गेला की चक्क विक्रेत्याने ग्राहकावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला. या घडलेल्या घटनेमुळे आता मनसे पक्ष पुन्हा आक्रमक झाला असून त्यांनी दादर मधील जी-उत्तर कार्यालयावर मोर्चा काढला.
तर मुंबईतील मुजोर फेरिवाल्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसैनिकांनी जी-उत्तर कार्यालयाबाहेर केली. तसेच फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकाच्या 150 मीटर क्षेत्राच्या आत बसण्याची परवानगी नाकारावी अशीसुद्धा मागणी काढलेल्या मोर्चात करण्यात आली. फेरीवाल्यांमध्ये बहुतांश ही परप्रांतीय असून युपी, बिहार आणि बांग्लादेश येथील आहेत. तर अशा फेरीवाल्यांवर कारवाई करावी असे निवेदनात मनसैनिकांनी पोलिस आणि पालिका प्रशासनाला सांगितले आहे.(मुंबई: 10 रुपयाचा वाद बेतला जीवावर! माथेफिरू भाजी विक्रेत्याने ग्राहकाला सुऱ्याने भोकसले)
दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर असणाऱ्या उड्डाणपुलाखाली गर्दुल्ले आणि काही मुजोर फेरीवाले बसतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा लोकांवर चाप बसण्यासाठी त्यांच्यावर जाचक निर्बंध घालण्यात यावेत. त्यामुळे येत्या 15 दिवसात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे मनसैनिकांना जी-उत्तर कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी सांगितले आहे.