Mumbai MHADA Housing Lottery Result 2023: मुंबई म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा निकाल ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात?
मुंबई मध्ये यंदा शीव, गोरेगाव, विक्रोळी, ताडदेव, दादर, वडळा, अॅन्टॉप हिल भागातील घरांचा समावेश होता
चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबई मध्ये म्हाडाची घरांसाठीची लॉटरी (Mumbai MHADA Housing Lottery) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये घरांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली होती. त्यानंतर दोनदा मुदत वाढ देऊन आता अखेर सोडत जाहीर कधी होणार ? याची उत्सुकता अर्जदारांना लागली आहे. विविध उत्पन्न गटामध्ये 4082 घरांसाठी सोडत जाहीर केली जाणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला ही सोडत जाहीर करण्याचा म्हाडाचा मानस आहे. सध्या त्यासाठी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांची वेळ घेतली जात आहे.
म्हाडा मुंबईच्या घरांसाठीच्या सोडतीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर करणार आहे. तत्पूर्वी 24 जुलै दिवशी म्हाडा कडून अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. यामध्ये पात्र उमेदवारांच्या यादीतून भाग्यवान विजेत्यांची नावं जाहीर केली जातील.
मूळ जाहिरातीनुसार 18 जुलै दिवशी मुंबई म्हाडा घरांच्या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार होता परंतू 11 जुलै पर्यंत अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आल्याने आता सोडतीच्या निकालाची तारीख देखील पुढे गेली आहे. आधी 10 जुलै पर्यंत मुदतवाढ आणि नंतर 11 जुलैला एक दिवस तांत्रिक दोष जाणवत असल्याने 24 तासांची मुदतवाढ देण्यात आली होती. नक्की वाचा: MHADA Houses: ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात तब्बल 12,724 सदनिका प्रस्तावित; जाणून घ्या मुंबई, पुणेसह कोणत्या प्रादेशिक मंडळात किती घरे बांधले जाणार.
मुंबई मध्ये यंदा शीव, गोरेगाव, विक्रोळी, ताडदेव, दादर, वडळा, अॅन्टॉप हिल भागातील घरांचा समावेश होता. मात्र उत्पन्न गट आणि घरांच्या किंमती यांचा ताळमेळ यावर्षी जाहिरातीमध्ये दिसत नव्हता. अनेकांसाठी घरांच्या किंमती केवळ कर्जावर अवलंबून घेणं शक्य नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. आता मुख्यमंत्री, उप्मुख्यमंत्र्यांकडून वेळ घेऊन म्हाडा लॉटरीच्या निकालाची तारीख जाहीर करू शकते.