खुशखबर! दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई मेट्रो सुरु करणार 'ट्रॅव्हल हेल्पडेस्क' जेथे पाल्यासह पालकांना मिळणार 'ही' विशेष सुविधा

या हेल्पडेस्कवर जाऊन विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट दाखवल्यानंतर त्यांना तत्काळ इच्छुक स्थानकाचे तिकीट उपलब्ध करून दिले जाईल.

Metro (Photo Credits: Twitter)

दहावी(SSC)-बारावीची (HSC) बोर्ड परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामध्ये 18 फेब्रुवारीपासून 12 वीची परीक्षा सुरु होणार असून 3 मार्चपासून 10 वीची परीक्षा सुरु होणार आहे. यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १च्या व्यवस्थापनाने अनोखी सुविधा देऊ केली आहे. मेट्रो 1 ने प्रवास करताना गर्दीमुळे परीक्षास्थळापर्यंत पोहोचण्यास उशीर होऊ नये यासाठी सर्वच स्थानकांवर विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल हेल्पडेस्क उभारले जाणार आहेत. या हेल्पडेस्कवर जाऊन विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट दाखवल्यानंतर त्यांना तत्काळ इच्छुक स्थानकाचे तिकीट उपलब्ध करून दिले जाईल.

ही सुविधा 18 फेब्रुवारी ते 30 मार्च या कालावधीत SSC, CBSE, ICSE या तिन्ही मंडळाच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या सेवेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे तसेच त्यांच्या परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचता येणार आहे. ही सेवा पाल्यासोबत त्यांच्या पालकांनाही देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- आरे जंगल नाही या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून शिवसेनेची सरकारवर टीका; संजय राऊत यांनी शेअर केलं व्यंगचित्र

या सुविधेमध्ये अंधेरी ते घाटकोपर या मेट्रो स्थानकांवर स्वतंत्र हेल्पडेस्क कार्यरत असून इतर स्थानकांवर कस्टमर केअरच हेल्पडेस्क म्हणून काम पाहतील. विद्यार्थ्यांनी हेल्पडेस्कवर हॉल तिकीट दाखवल्यानंतर त्यांना तिकीट उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, स्वतंत्र सुरक्षा तपासणीद्वारे रांगेविना फलाटावर जाण्याची परवानगी दिली जाईल. ही सेवा प्रामुख्याने वर्सोवा, आझाद नगर, अंधेरी, चकाला-जेबी नगर, मरोळ नाका व घाटकोपर या स्थानकांवर असेल.

विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही विशेष सुविधा ठेवण्यात आली असल्याचे मेट्रोच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे.