Mumbai Metro चा मासिक पास महागला, तर स्मार्टकार्ड रिचार्जवर मिळणार कॅशबॅक
मेट्रोचा एक महिन्याचा पास (MTP) 25 ते 50 रुपयांनी महागला आहे. 1 फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू होतील.
मुंबई मेट्रो (Mumbai Metro) मुंबईकरांसाठी एक वरदान ठरत आहे. मेट्रोच्या आगमनाने कित्येक लोकांनी लोकल रेल्वे आणि रस्ते मार्गांना फाटा देऊन मेट्रोचा वापर करण्यास सुरुवात केली. मात्र या मेट्रोच्या दरांमध्ये आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. मेट्रोचा एक महिन्याचा पास (MTP) 25 ते 50 रुपयांनी महागला आहे. 1 फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू होतील. अशातच दुसरीकडे मेट्रोने प्रवाशांना कॅशबॅकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तिकिटांवर कॅशबॅक देणारी मुंबई मेट्रो ही भारतातील कदाचित एकमेव मेट्रो असेल.
मेट्रोचा मासिक पास हा 30 दिवसांमधील 45 फेऱ्यांसाठी वैध असतो. आता या मासिक पासची किंमत वाढली आहे. नव्या दरांनुसार 2-5 किमी, 5-8 किमी आणि 8 किमी. पेक्षा जास्त अंतरासाठी आता अनुक्रमे 775, 1,150 आणि 1,375 रुपये मोजावे लागणार आहेत. तर तुमचे मासिक पास तुम्ही एसव्हीपी (SVP) ने रिचार्ज केल्यास तुम्हाला 2 ते 10 % कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजे जर का तुम्ही 800 रुपयांचा रिचार्ज केला तर त्यावर तुम्हाला 80 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. (हेही वाचा : मुंबई परिसरातील तीन नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा)
यासंदर्भात बोलताना, मुंबई मेट्रोचे प्रवक्ते म्हणाले, ‘प्रवाशांनी जास्तीत जास्त स्मार्टकार्डचा वापर करावा म्हणून आणि ही कॅशबॅकचे योजना सुरु केली आहे.’ सध्या मुंबई मेट्रो ही काही प्रमाणात तोट्यात चालली आहे. म्हणून या मासिक पासचे दर वाढवण्यात आले आहेत. तसेच रिटर्न जर्नीवर दिली जाणारी 2.5 रुपयांची सवलही बंद करण्यात आली आहे.