Mumbai Mega Block: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर नाईट ब्लॉक; पहा वेळापत्रक
रेल्वेमार्गांची दुरुस्ती, डागडुजी अशा विविध कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो.
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेला रविवारीच्या दिवशी काहीशी विश्रांती मिळते. रेल्वेमार्गांची दुरुस्ती, डागडुजी अशा विविध कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. 5 मे रविवार, या दिवशीही रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे गैरसोय, त्रास टाळण्यासाठी मेगाब्लॉकच्या वेळा तपासूनच मग बाहेर पडा.
मध्य मार्गावर कल्याण-ठाणे दरम्यान आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड-मानखुर्द स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर बांद्रा येथील पादचारी पुलाचे गर्डर पाडण्याचे काम सुरु असल्याने पश्चिम रेल्वेच्या अप जलद मार्ग आणि अप डाऊन मार्गावर 6 तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे
कल्याण-ठाणे या अप जलद मार्गावर सकाळी 10:54 ते दुपारी 3:52 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉक काळात सर्व लोकल अप धीम्या मार्गावरुन धावतील. त्यामुळे अप फेऱ्या सुमारे 20 मिनिटं आणि डाऊन फेऱ्या सुमारे 15 मिनिटे उशिराने धावतील. त्याचबरोबर मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस सुमारे 30 मिनिटे विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे
वडाळा रोड-मानखुर्द या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या दरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र पनवेल-मानखुर्द दरम्यान विशेष लोकल धावतील. हार्बर रेल्वे प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 पर्यंत मध्य आणि ट्रान्सहार्बरवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे (नाईट ब्लॉक)
बांद्रा स्थानकात अप जलद आणि अप-डाऊन हार्बर मार्गावर शनिवार (4 मे) रात्री 11 ते रविवार (5 मे) पहाटे 5 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या काळात हार्बर मार्गावरील अंधेरी ते सीएसएमटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अप जलद मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या सांताक्रुझ आणि माहिम स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरुन धावतील.
पश्चिम रेल्वे ट्विट:
# सीएसएमटीहून अंधेरीकडे जाणारी शेवटची डाऊन लोकल - रा. 10:12
# अंधेरीहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची अप लोकल - रा. 10:38
त्याचबरोबर वसई रोड ते भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरही 4 मे रात्री 12:30 ते 5 मे पहाटे 4 वाजेपर्यंत नाईट ब्लॉक असल्याने काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.