मुंबई: गांजाची पुडी न दिल्याने तीन दारुड्यांकडून तरुणाची हत्या; आरोपी अटकेत

एका तरुणाने गांजाची पुडी न दिल्याने त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कॉटन ग्रीन येथून समोर आली आहे. आमीन पटेल (32) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

मुंबई: गांजाची पुडी न दिल्याने तीन दारुड्यांकडून तरुणाची हत्या; आरोपी अटकेत
Representational Image (Photo Credits: File Photo)

गांजाची पुडी न दिल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईतील (Mumbai) कॉटन ग्रीन (Cotton Green) येथून समोर आली आहे. आमीन पटेल (32) असे या मृत तरुणाचे नाव आहे. गांजाची पुडी न दिल्याने लाकडी बांबू व लाथाबुक्यांनी मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनच्या (Cotton Green Railway Station) स्काय वॉयवर (Skywalk) ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलासह राज भारतवाज आणि अन्य एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. (गोंदिया: दहावीचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या)

बंटी कांबळे आणि त्याचा मित्र आमीन पटेल हे दोघे कॉटन ग्रीन स्टेशनच्या स्कायवॉकजवळ बोलत होते. त्यावेळी दारुच्या दुकानात दारु पित बसलेल्या तिघांनी आमीनला अडविले आणि गांजाची मागणी केली. त्यावर आपल्याकडे गांजा नसल्याचे आमीन याने सांगितले. त्याचा राग आल्याने तिघांनी आमीन याला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. नंतर जवळ पडलेला लाकडी बांबू डोक्यात घातला. या प्रहारात आमीन रक्तबंबाळ होत खाली कोसळला. त्यानंतर तिघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला. आमीनला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. (मुंबई: 5 रुपयांसाठी रिक्षाचालकाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून हत्या)

या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर दोघंजण पोलिस कोठडीत आहेत.

शुल्लक कारणांवरुन होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. यापूर्वी 5 रुपयांसाठी पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याने रिक्षाचालकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बोरीवली येथून समोर आला होता.

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2020 11:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).