मुंबई: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; वाशिंद - खडवली स्थानकांदरम्यान रेल्वे रूळाला तडे
सध्या मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे 20-30 मिनिटं उशिराने धावत आहेत.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा आज (9 मार्च) आठवडाचा पहिला दिवस रखरखडत सुरू झाला आहे. दरम्यान आज सकाळी वाशिंद - खडवली (Vashind-Khadvali) स्थानकांदरम्यान रेल्वेच्या रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ऐन कामाला जाण्याच्या वेळेदरम्यान हा बिघाड झाल्याने रेल्वे स्थानकांसह ट्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. सध्या मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे 20-30 मिनिटं उशिराने धावत आहेत. सकाळी रेल्वे रूळाला तडे गेल्याचं लक्षात येताच तात्काळ प्रशासनाकडून बिघाड दुरूस्त करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.
ऐरवी रविवारचा मेगा ब्लॉक घेऊन रेल्वे प्रशासनाकडून दुरूस्तीचं काम हाती घेतलं जातं. यामध्ये ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यांच्या दुरूस्तीच्या कामासोबत रेल्वे रूळाच्या डागडुजीचे कामदेखील केले जाते. मात्र आज सकाळीच रेल्वे रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेवरील प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. लोकलच्या मागे मालगाडी आणि लांबपल्ल्याच्या गाड्या अडकल्या आहेत. जिथे तडा गेला होता तिथे मर्यादित वेगाने गाड्या चालवल्या जात असल्याने वेळापत्रक विस्कळीत झालं आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान विकेंडला जोडून यंदा होळीचा सण आल्याने अनेकांनी ऑफिसला बुट्टी मारून सलग चार दिवसांचा आनंद घेण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे तुलनेत काही ठिकाणी चाकरमान्यांची गर्दी कमी आहे. मात्र शाळा, कॉलेजमध्ये सध्या परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.