Mumbai Local Trains Update: मुंबई लोकल सेवा आजपासून पुन्हा सुरु, केवळ 'या' प्रवाशांना मुभा; पहा मध्य आणि पश्चिम रेल्वेचे सूचनावली व वेळापत्रक

राज्य सरकार कडून अत्यावश्यक सेवा कर्मचारी म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई ची लाईफलाईन म्हणजेच मुंबई लोकल (Mumbai Local) ट्रेनची वाहतूक आज दोन महिन्यांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राज्य सरकार कडून अत्यावश्यक सेवा कर्मचारी म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) व मध्य (Central Railway)  आणि पश्चिम रेल्वेने (Western Railway) ही घोषणा केली. दोन महिन्यांनंतर सेवा सुरू झाल्या आणि सर्वसामान्यांना या गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही त्यामुळे प्लॅटफॉर्म वर गर्दी करून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात रेल्वे कडून काही सूचना देणारे एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे . Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

पश्चिम रेल्वे विरार आणि डहाणू रोड दरम्यानच्या 73 जोड्या उपनगरी लोकल चालवणार आहे. या गाड्या अंदाजे 15 मिनिटांच्या अंतराने सकाळी 5.30 ते रात्री 11.30 या वेळेत धावतील. जास्तीत जास्त सेवा चर्चगेट ते विरार दरम्यान चालतील, तर डहाणू रोडपर्यंत काही ट्रेन्स असतील. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या ट्रेन मार्फत दिवसाला लोकलच्या 200 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.यापैकी 130 लोकल याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा/ कर्जत/ कल्याण/ ठाणे अशा धावतील तर 70 लोकल या CSMT ते पनवेल दरम्यान चालवण्यात येतील.

आजपासून सुरु होणाऱ्या लोकल सेवेसाठी रेल्वे कडून काही सूचना देण्यात आल्या आहेत यानुसार, प्रवाशांनी आवश्यक तितके सोशल डिस्टंसिंगपाळणे अनिवार्य आहे. इतरवेळेस ज्या लोकल मधून एकावेळी 1200 जण प्रवास करण्याची मुभा होती तिथे आता केवळ 700 प्रवाशांना परवानगी असेल. या व्यतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने आपल्या कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळा या प्राईम टाइम पेक्षा वेगळ्या ठेवाव्यात जेणेकरून एकाच वेळी सगळी गर्दी होणार नाही असेही रेल्वे तर्फे सुचवण्यात आले होते. मुख्य म्हणजे प्रवास करणारे सर्वच वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजेत आणि प्रवासी कंटेनमेंट झोन मधून आलेला नसावा अशीही अट ठेवण्यात आली आहे.

पहा ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस चा उद्रेक हा देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. राज्यात कोरोना चे 1,04,568 रुग्ण आहे. याच पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या, मात्र यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती, अशावेळी निदान या कर्मचाऱ्यांसाठी तरी रेल्वे सुरु करण्यात याव्यात याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र व रेल्वे मंत्रालयाकडे विनंती केली होती. यानुसार आजपासून या लोकलसेवा सुरु होत आहेत.