Mumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे सुरळीत
मुंबई मध्ये आज मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक असून पश्चिम रेल्वे मार्गावर नियमित वाहतूक सुरू राहणार आहे.
मुंबई मध्ये आज रेल्वेने बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आधी मेगाब्लॉकचं (Mega Block) वेळापत्रक पाहून तुमचा प्लॅन बनवा. मुंबई मध्ये आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक नाही त्यामुळे तेथे प्रवाशांचा प्रवास सुस्साट होणार आहे. मुंबईची लाईफलाईन असणार्या लोकल ट्रेनच्या देखभालीच्या आणि दुरूस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेऊन कामं केली जातात. त्यानुसार आजही ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग यंत्रणांच्या देखभालीसाठी कामं हाती घेण्यात आली आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार - ठाणेदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामासाठी सकाळी 11 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर CSMT ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटणाऱ्या/येणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान, डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा 10-15 मिनिटं उशिराने गाडी पोहचण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड इथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे इथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. पण या काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.