Aarey Colony परिसरात 2 दिवसांपूर्वी चिमुकलीवर हल्ला झालेल्या परिसरातील सापळ्यात अडकला बिबट्या

आज त्याच्या भागात हल्ला झालेल्या ठिकाणाहून 200 मीटर अंतरावर बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.

Leopard | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

मुंबई (Mumbai) मधील आरे कॉलनीत (Aarey Colony) दिवाळी दिवशीच अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला करून तिचा जीव घेतला होता. या हल्ल्यामुळे या भागात नागरिक भयभीत झाले होते. आज दोन दिवसांनंतर वन विभागाला सापळा लावत बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आले आहे. पण हाच हल्लेखोर बिबट्या होता का? याचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही. बिबट्याला पकडून त्याला आता बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये (Sanjay Gandhi National Park) आणण्यात आले आहे. काल वनविभागाकडून सापळा लावण्यात आला होता.

सोमवार (24 ऑक्टोबर) दिवशी आईसोबत दिवाळीचा दिवा लावण्यासाठी मंदिरात जाऊन येताना या चिमुकलीवर हल्ला झाला होता. आज त्याच्या भागात हल्ला झालेल्या ठिकाणाहून 200 मीटर अंतरावर बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. मृत इतिहा लोट या चिमुकलीला जखमी अवस्थेमध्ये पाहून हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. या घटनेनंतर आरे कॉलनीत युनिट नंबर 15 मध्ये राहणार्‍यांनी संताप व्यक्त करत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.

वनविभागाकडून या दुर्देवी घटनेची दखल घेत युनिट नंबर 15 ते आदर्श नगर भागात 22 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 2 पिंजरे लावले. आज सकाळी 6.30 च्या सुमारास बिबट्या पिंजर्‍यात अडकला.