IPL Auction 2025 Live

मुंबई: BEST बस अपघातात पत्नीला गमावलेल्या पतीला मिळणार 55 लाखांची भरपाई

संबंधित महिला ही TCS Vigilance Scientist होती.

BEST Bus | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

सहा वर्षांपूर्वी बेस्ट बस अपघातात (BEST Bus Accident) मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीला भरपाई म्हणून 55 लाख रुपये देण्याचा आदेश न्यायाधिकरणानं दिला आहे. संबंधित महिला ही TCS Vigilance Scientist होती. मुंबई (Mumbai) मधील बीकेसी (BKC) येथे या महिलेसह तिच्या मैत्रिणीला बेस्ट बसने धडक दिली होती. या अपघातानंतर मृत महिलेचे पती पियुष कोठारी यांनी सप्टेंबर 2015 मध्ये मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेतली होती. अखेर 6 वर्षानंतर न्यायधिकरणाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर कोठारी यांना न्याय मिळाला आहे.

संध्या कोठारी असे या मृत महिलेचे नाव असून त्या आपली मैत्रिण टीना मोटवानी सोबत दुचाकीवरुन साडी खरेदीसाठी जात होत्या. यावेळी टीना या दुचाकी चालवत होत्या तर संध्या पाठीमागे बसल्या होत्या. त्यावळेस बेस्ट बसच्या धडकेत संध्या आणि टीना यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (मुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल)

27 जून 2015 मध्ये हा अपघात झाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात संध्या यांच्या पतीने मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेत न्यायासाठी तब्बल 6 वर्ष लढा दिला. अखेर सहा वर्षांनंतर न्यायाधिकरणानं  मृत महिलेच्या पतीला बेस्टने 55 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, अपघात झाला त्यावेळी संध्या कोठारी या 26 वर्षांच्या असून त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्या टीसीएसमध्ये विजिलन्स सायंटिस्ट म्हणून कार्यरत होत्या. त्यांना मासिक 20,000 रुपये इतके वेतन होते.