Mumbai Health Centres: मुंबईमध्ये 26 जानेवारीपर्यंत सुरु होणार 100 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे केंद्रे; गरिबांना मिळणार स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा
सर्दी, खोकला, ताप, त्वचेच्या समस्या आणि इतर हंगामी संसर्ग यांसारख्या आजारांवर केंद्रांवर उपचार केले जातात.
गरिबांना स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी बीएमसीने (BMC) आपली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (HBT) आरोग्य केंद्रे शहरभर सुरू केली आहेत. आत्तापर्यंत, नागरी संस्थेद्वारे मुंबईच्या विविध वॉर्डांमध्ये 52 पोर्टा केबिन उभारल्या गेल्या असून, ज्यामध्ये आणखी 24 एचबीटी केंद्रे 2 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहेत.
अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, ’26 जानेवारीपर्यंत शहरात 10 आरोग्य केंद्रे उभारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्यापुढे फेब्रुवारीअखेर सुमारे 200 एचबीटी केंद्रे पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’ बीएमसीने जाहीर केले होते की एका वर्षात 250 एचबीटी केंद्रे सुरू केली जातील जेणेकरून गरिबांना त्यांच्या घराजवळ मोफत उपचार मिळू शकतील.
यापैकी बरीचशी केंद्रे झोपडपट्टी भागात उघडली जात आहेत. महत्वाचे म्हणजे या केंद्रांवर दीड लाख लोकांनी उपचार घेतल्याच्या नोंदी आहेत. धारावीमध्ये 15 केंद्रे, तर गोवंडी आणि मालाडमध्ये 10 केंद्रे पुढील महिन्यात सुरू करण्याची योजना आहे. साधारण 25,000 ते 30,000 लोकांमागे एक एचबीटी केंद्र उभारण्याची बीएमसीची योजना आहे.
प्रत्येक एचबीटी केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांसह एक एमबीबीएस डॉक्टर आणि दोन परिचारिका असतात. सर्दी, खोकला, ताप, त्वचेच्या समस्या आणि इतर हंगामी संसर्ग यांसारख्या आजारांवर केंद्रांवर उपचार केले जातात. यासह हे केंद्र 147 प्रकारच्या चाचण्या करण्यास सक्षम आहे. सोबतच स्वस्त वैद्यकीय चाचण्या देण्यासाठी नागरी संस्थेने खाजगी प्रयोगशाळांशी करार केला आहे. ही केंद्रे सकाळी 7 ते 2 आणि दुपारी 3 ते 10 या दोन सत्रात सुरु आहेत. या वेळा नागरिकांच्या सोयीनुसार ठरवण्यात आल्या आहेत.