मुंबई: कुर्ला विभागातील वाहतूक पोलीस हवालदाराचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू
याबाबत मुंबई पोलिसांनी ट्वीट करत त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालल्याने त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. तर डॉक्टरांप्रमाणेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यांवर गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान एक अत्यंत दुखद बातमी असून कुर्ला विभागातील वाहतूक पोलीस हवालदाराचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी ट्वीट करत त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या परिवाराच्या दुखात आम्ही सुद्धा सहभागी असल्याचे पोलिसांच्या वतीने म्हटले गेले आहे. यापू्र्वी तीन पोलीस दलातील वीरांचा कोरोनाच्या विरोधातील लढाई लढत असताना निधन झाल्याची घटना घडली आहे.
शिवाजी नारायण सोनावणे (56) असे त्यांचे नाव असून कोरोानाच्या विरोधातील लढाईत त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस दलातील कर्मचारी त्यांचे कोरोनाच्या परिस्थितीत परिपूर्ण आपले कर्तव्य बजावत आहेत.तसेच नागरिकांना वारंवार घराबाहेर पडू नका असे आवाहन सुद्धा करत आहेत. तरीही काही समाज कंटकांकडून त्यांच्यावर हल्ले केले जात असल्याच्या संतापजक घटना घडल्याचे समोर आले आहेत. मात्र नागरिकांनी कोरोनाची परिस्थिती समजून घेऊन नियमांचे पालन करावे हे सर्वात महत्वाचे आहे. तसेच पोलीस दलातील कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावत असून त्यांना सहकार्य करावे असे ही सांगण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या विरोधातील लढाईत मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला सरकारकडून 50 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याचसोबत परिवारातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी स्पष्ट केले आहे.(Coronavirus: कोरोनामुळे तिसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; नवी मुंबईत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास)
दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असून नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तरच कोरोनाची साखळी तोडण्यास आपल्याला यश येईल असे सांगण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थितीत स्वत:सह परिवाराची काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.