कांदिवली: कापड गोदामाला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू

आग आटोक्यात आल्यानंतर जवानांनी हाती घेतलेल्या शोधमहीमेत या चार जणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले. आगीचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही.

Fire Accident | (photo courtesy: archived, edited, symbolic images)

कांदिवली (Kandivali)येथील दामूनगर (Damu Nagar) परिसरात लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग (Fire Accident) एका कापड दुकानाला लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आग आटोक्यात आल्यानंतर जवानांनी हाती घेतलेल्या शोधमहीमेत या चार जणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले. आगीचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. 

प्राप्त माहितीनुसार, राजू विश्वकर्मा, राजेश विश्वकर्मा, भावेश पारेख आणि सुदामा लल्लनसिंह अशी या आगीत मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत. सकाळीच आग भडकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगिची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. 4 फायर इंजिन आणि पाण्याचे 4 टॅंकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आग आटोक्यात आली तेव्हा कोणतीही जीवीत हानी झाल्याचे समोर आले नव्हते. मात्र, शोधमोहिमेत या चौघांचे मृतदेह हाती आले. (हेही वाचा, भिवंडी येथे लागलेल्या भीषण आगीत 11 गोदामं जळून खाक)

आग लागण्याच्या घटना आता मुंबई आणि मुंबईकरांसाठी नव्या राहिल्या नाहीत. प्रत्येक महिन्यातील प्रत्येक आठवड्यात कोठे ना कोठे आग लागल्याची घटना घडत आहे. काल (रविवार, २४ नोव्हेंबर) सकाळीही खाररोड येथील एका सलूनला आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. मात्र, या घटनेला काही तास उलटतात तोच पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे.