Mumbai Hostel Case: राज्य सरकारकडून वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन, चंद्रकांत पाटील यांची माहिती
चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबीयांना या घटनेच्या तपासाची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
मुंबईतील सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबीयांना या घटनेच्या तपासाची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मृत मुलीच्या कुटुंबीयांना भावनीक आधार देण्याचा देखील प्रयत्न केला. कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, मृत विद्यार्थीनीचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील शासकीय वसतिगृतील विद्यार्थीनीवर वसितीगृहाच्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार करुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:देखील रेल्वेखाली जाऊन आपला जीव दिला. त्यानंतर संध्याकाळी पोलिसांना वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावर या तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यास निदर्शनास आलं होतं. तेव्हा पोलिसांनी त्या सुरक्षा रक्षकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु काहीच वेळात त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2023 10:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

