Mumbai Fire: भायखळा मध्ये Monte South इमारतीमध्ये 10व्या मजल्यावर आग; जीवितहानीचं वृत्त नाही
मुंबई मध्ये भायखळा (Byculla) येथील एका टोलेजंग इमारती मध्ये काल रात्री आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. PTI च्या वृत्तानुसार ही आग Monte South इमारतीच्या A wing मध्ये दहाव्या मजल्यावर लागली होती. भायखळा पश्चिम मध्ये ही इमारत खटाव मिल कम्पाऊंडच्या आवारात आहे. ही आगीची घटना काल रात्री 11.42 च्या सुमारासाची आहे. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर 3 च्या सुमारास ही आग विझवण्यात यश आले.
भायखळा मधील या आगीमध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही परंतू अनेक जण आग भडकल्याने वरच्या मजल्यावर अडकून पडले होते. आग लागल्याने अचानक दहाव्या मजल्यावर धुर पसरला होता आणि त्यामधून रस्ता काढणं कठीण असल्याने अनेक जण वरच अडकून बसले होते.
आगीच्या या घटनेमध्ये तातडीने आग विझवण्यासाठी 8 फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. आग विझवण्यासोबतच तातडीने वरच्या मजल्यावर अडकलेल्या लोकांची देखील सुटका फायर ब्रिगेड कडून करण्यात आली आहे. Mumbai Fire: मुंबईतील धारावी येथे इमारतीला आग, सहा जण गंभीर जखमी .
मुंबई फायर ब्रिगेड, मुंबई पोलिस, 108 एम्ब्युलंस सर्व्हिस, पालिका, बेस्ट कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत इमारतीमधील लोकांना मदत केली. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाकडून त्याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी नोएडा मध्ये अशाच एका उच्चभ्रू सोसायटीत एसीचा ब्लास्ट झाल्याने आग लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आग लागल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट असल्याने या आग लागण्याच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.