Mumbai: बृहन्मुंबई हद्दीत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी; पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बॅण्ड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
बृहन्मुंबई (BMC) हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 5 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बॅण्ड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था, इतर सोसायट्या आणि संघटना यांच्या बैठकांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.
यासह बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 जानेवारी 2024 पर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र वाहतूक बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे, अग्नीशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, विना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या,इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी करण्यासाठी वापरली जाऊ शकते, अशी हत्यारे बाळगणे, स्फोटके वाहून नेणे, प्रेत, आकृती, पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे यावर बंदी घालण्यात येत आहे.
कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत, नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार शस्त्रे बाळगण्यासाठी तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा, चौकीदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 18 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहे. (हेही वाचा: Liquor Shops in Mumbai: मद्यप्रेमींसाठी दिलासा! मुंबईत 31 डिसेंबर रोजी रात्री 1 पर्यंत चालू राहणार दारूची दुकाने)
यासह, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच उडणारे व हाय राइजर फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारी वस्तू, पतंग, लेझर बीम प्रदीपन आदींमुळे विमानांचे सुरक्षित येणे-जाणे धोक्यात येते. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजूच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)