मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना: राजकीय नेते काय म्हणाले पाहा
मात्र, काही वेळातच राजकीय नेतेमंडळींनी घटनास्थळावर हजेरी लावली. प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा, आरोप प्रत्यारोप आणि जबाबदारी झटकण्याचा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
Mumbai CSMT footover bridge Accident: मुंबई सीएसएमटी (Mumbai CSMT) आणि कामा रुग्णालय या दोन ठिकाणांच्या अगदी नजीक असलेला पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास कोसळला. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू तर, २० पादचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येते आहे. ही घटना घडल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र, काही वेळातच राजकीय नेतेमंडळींनी घटनास्थळावर हजेरी लावली. प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा, आरोप प्रत्यारोप आणि जबाबदारी झटकण्याचा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी सांगितले की, हा पूल साधारण दिडशे वर्षे जुना आहे. या पुलाच्या देखरेखेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. मुंबईतील धोकादायक पुलांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. मुंबई महापालिकेने या पुलाचे ऑडीट व्हावे असे पत्र रेल्वे प्रशासनाला दिले होते. माझ्या आगोदर असलेले माजी नगरसेवक सानप यांनीही पुलाचे ऑडीट व्हावी अशी मागणी केली होती. मात्र, या पत्राची दखल रेल्वे प्रशासाने घेतली नाही. आम्ही या दुर्घटनेबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारणार आहोत.
शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मुंबई महापालिकेकडून रेल्वे प्रशासनाला पुलाच्या ऑडिटबाबत पत्र देण्यात आले होते. मला मिळालेल्या महितीनुसार, रेल्वे प्रशासनाने पुलाची पाहणी केली होती. या पुलाचे नाव धोकादायक पुलाच्या यादीत नव्हते. तसेच, या पुलाचे थोड्याफार प्रमाणात डागडुजी (मायनर रिपेरींग) करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले होते. या पुलाची डागडुजी करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या नियमांनुसार सुरु होणार होती. त्यासाठी नजिकच्या काळात प्रस्ताव पास होणार होता. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडल्याचे सावंत यांनी सांगितले. (हेही वाचा, व्हिडिओ: मुंबई सीएसएमटी रेल्वे स्टेशन जवळ पादचारी पूल कोसळला; 3 ठार, 23 जण जखमी )
एमआयएम आमदार वारीस पठाण यांनीही घटनास्थळी हजेरी लावली. ते म्हणाले या सरकारच्या काळात काय चालले आहे तेच समजत नाही. सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ध्यानतच घेत नाही. ही घटना घडण्यापूर्वी काहीच खबरदारी घेण्यात आली नाही. ही घटना घडल्यावर सरकार दोषींवर कारवाई करेन. परंतू, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाले त्यांचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.