Mumbai Crime: धक्कादायक! 72 वर्षीय बोगस महिला वकिलाला अटक, 14 वर्षांपासून सुरु होती वकिली
नकली कागदपत्रांच्या आधारे आपण वकील असल्याचे भासवून 2008 पासून म्हणजेच पाठिमागील 14 वर्षे ही महिला वकिली करत असल्याचा तिच्यावर आरोप आहे.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका 72 वर्षीय महिला वकिलाला (Women Lawyers) अटक केली आहे. नकली कागदपत्रांच्या आधारे आपण वकील असल्याचे भासवून 2008 पासून म्हणजेच पाठिमागील 14 वर्षे ही महिला वकिली करत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. बीकेसी पोलिसांना एका प्रकरणात तिचा संशय आल्याने त्यांनी तिला ओळखपत्र पडताळणीसाठी बोलवले असता ती हजर झाली नाही. पोलिसांचा संशय अधिकच बळावल्याने तिच्याकडे इतर काही कागदपत्रे मागण्यात आली. तेव्हा तिच्या बोगसगिरीचा भांडाफोड झाला. बीकेसी पोलिसांनी या बोगस वकिल महिलेला अटक (Fake Lawyers Arrested ) केली आहे.
बीकेसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरदेकाई रेबेका जौब उर्फ मंदाकिनी काशिनाथ सोहिनी (Mordekai Rebecca Joub alias Mandakini Kashinath Sohin) , वांद्रे पश्चिमेतील पाली हिल येथील रहिवासी असलेल्या महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी 15 जुलै रोजी तिच्या ओळखपत्रांची पडताळणी करण्यासाठी बोलावले होते, परंतु ती पोलिसांसमोर आली नाही.
सोहिनी शनिवारी जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये गेली आणि तिची पदवी आणि वकालतनम्यासह पोलिसांनी तिची पदवी आणि इतरही काही कागदपत्रे तपासली. त्यात कोणतीच सत्यता आढळून आली नाही. तिची कागदपत्रे आणि कायद्याचा सराव करण्याचा परवाना बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या फसवणुकीची माहिती देण्यासाठी आम्ही आता महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलशी संपर्क साधला आहे, असे पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलतना म्हटले आहे.
बोरिवलीत राहणारे वकील अकबरअली मोहम्मद खान (44) यांनी सोहिनीविरोधात तक्रार दाखल केली होती. सोहिनी या वकील नसून मुंबईतील कौटुंबिक आणि इतर न्यायालयात अनेक दशकांपासून प्रॅक्टिस करत असल्याचा दावा त्यांनी केला. बीकेसी पोलिसांनी सोहिनीला अटक करून रविवारी वांद्रे कोर्टात हजर केले.
वकील अकबरअली मोहम्मद खान यांनी मीड डेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, मी ऑटो रिक्षा चालवून कायद्याचा अभ्यास केला आणि खूप मेहनत करून वकील झालो. असे खोटे लोक वकिली व्यवसायाला बदनाम करत आहेत. ही जबाबदारी बार कौन्सिलची आहे. त्यांनी वेळोवेळी बार कौन्सिलकडे नोंदणी केलेल्या वकिलांची पडताळणी केली पाहिजे, असेही खान पुढे म्हणाले.
दरम्यान, सदर महिलेला आम्ही अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता तिला पोलीस कोठडी मिळाली आहे. तिला 20 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.