माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर दिवसाढवळ्या महिलांची छेडछाड; किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हा संपूर्ण किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
माटुंगा रेल्वे स्थानकाच्या (Matunga Railway Station) पुलावर दिवसाढवळ्या महिलांची छेडछाड आणि विनयभंग केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र, कोणतीही महिला आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करत नसल्यामुळे पोलीस हातबल झाले आहेत. जर कोणी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली तर, आम्ही त्याच्याविरोधात कडक कारवाई करू, असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. तसेच तक्रारदार महिलेची ओळख गुपीत ठेवली जाईल, असेही सांगण्यात येत आहे.
रजिऊर खान असे या विकृताचे नाव असून महिलांची छेडछाड आणि विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी याला ताब्यात घेतले आहे. माटुंगा रेल्वे स्थानकावरील 6 आणि 7 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पुलावर हा प्रकार घडला आहे. महत्वाचे म्हणजे, हा पुल रात्री 7 वाजल्यानंतर निर्मनुष्य असतो. याचाच फायदा घेत खानने अनेक महिलांचा विनयभंग केला होता. आतापर्यंत खानने 2 दोन महिलांचा विनयभंग केला आहे. परंतु कोणतीही महिला खानच्या विरोधात तक्रार करायला तयार नाहीत. यामुळे खानला केवळ चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे देखील वाचा- बुलढाणा: रात्रीच्या सुमारास प्रेयसीच्या घरात घुसणे एका प्रियकराला पडले महागात
ट्वीट-
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, तरी वारंवार अशा घटना घडत असल्याने मुंबईत नोकरीसाठी, शिक्षणासाठी आणि इतर कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबईत राहणाऱ्या महिला सुरक्षित आहेत का? असाही प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. याशिवाय वरिल घटनेच्या आरोपीला कठोर शिक्षा होणार की, चोरीच्या नावाखाली त्याची सुटका होणार याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. नुकतीच दहिसर येथे एका तरुणीवर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान, पीडित तरूणी गंभीर भाजली असून तिच्यावर खाजगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तसेच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.