Mumbai Crime: गरम समोसा मागणे पडले महागात, मुंब्रामध्ये दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके

दुकानदाराने ग्रहाकावर हल्ला करत त्याला जखमी केले. सध्या जखमीवर उपचार सुरू आहेत.

Photo Credit- Pixabay

Mumbai Crime: मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या जियाउद्दीन शेख यांना गरम समोसा (Samosa)खाण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे त्यांनी जवळच आनंद कोळीवाडा येथे असलेल्या माजिद शेख यांचे दुकान गाठले. जियाउद्दीन यांनी समोसा मागताच माजिद शेख यांनी समोसा दिला. मात्र, तो काहीसा थंड होता. त्यामुळे जियाउद्दीन यांनी गरम समोसा(Hot Samosa) देण्याची मागणी केली. त्यावर संतापलेल्या माजिद शेख यांनी जियाउद्दीन यांना खायचा असेल तर खा नाहीतर निघ, असे ठणकावले. यावर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यामुळे जियाउद्दीन रागारागाने तिथून बाहेर पडले. (हेही वाचा:Mumbai Crime News: मोबाईलच्या वादातून बहिणींचे केस कापले! हल्लेखोर भावाला अँटॉप हिल पोलिसांकडून अटक )

मात्र, त्यावरही दुकानदार काही शांत झाले नाही. त्यांनी मागूण येत जियाउद्दीन यांना गाठले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात जियाउद्दीन याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना ५ ते ६ टाके देखील पडले. त्यांचा कान देखील थोडा कापला गेला. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणाची तक्रार मुंब्रा पोलिसात करताच पोलिसांनी भादवी ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

मुंबईत वडापाव नंतर समोसा अनेकांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे समोसे गरमगरम असावेत अशी खवय्यांची इच्छा असते. परंतु गरम समोसे खाणे एकाला चांगलेच महागात पडल्याचे या घटनेतून समोर आले आहे.