Mumbai: दादर मेट्रो स्थानकाचे बांधकाम सुरु; पुढील 1 वर्षांसाठी वाहतुकीमध्ये झाले 'हे' बदल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) भूमिगत दादर मेट्रो रेल्वे स्थानक बांधणार आहे, आणि या कामाच्या दरम्यान, दादरमधील लेफ्टनंट अण्णा टिपणीस चौक ते गडकरी चौक दरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीवर परिणाम होणार आहे

Image For Representation (Photo Credits-Facebook)

मेट्रो लाइन 3 च्या दादर मेट्रो रेल्वे स्टेशनच्या भूमिगत बांधकामाच्या पार्श्वभुमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी दादर (प.) मधील स्टीलमन जंक्शन आणि गडकरी चौक दरम्यान मध्य मुंबईत निर्बंध लागू केले आहेत. पुढील वर्षी 11 मार्चपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) भूमिगत दादर मेट्रो रेल्वे स्थानक बांधणार आहे, आणि या कामाच्या दरम्यान, दादरमधील लेफ्टनंट अण्णा टिपणीस चौक ते गडकरी चौक दरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही वाहतुकीमध्ये बदल केले आहेत.

अधिसूचनेत म्हटले आहे की, गडकरी चौक ते स्टीलमन जंक्शन दरम्यान गोखले रोडच्या उत्तरवाहीनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. दक्षिणेकडील मार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला असेल. या व्यवस्थेच्या पार्श्वभुमीव रस्त्याच्या दोन्ही बाजूला 24 तास 'नो पार्किंग' झोन असतील.

रानडे रोड या मार्गावरील सेनापती बापट पुतळ्या चौकापासून स्टीलमन जंक्शनकडे जाण्यासाठी वाहनांना प्रवेश नसेल. या कालावधीत स्टीलमन जंक्शन ते सेनापती बापट पुतळा हा वन वे रस्ता असेल.

पोर्तुगीज चर्चकडून गोखले रोडवरील उत्तरेकडून येणारी वाहने स्टीलमन जंक्शनपासून डावीकडे वळणे घेऊन, पुढे रानडे रोड, दादासाहेब रेगे रोड, गडकरी जंक्शन येथे आल्यावर माहीमच्या दिशेने मार्गक्रमण करतील. (हेही वाचा: Mumbai: 'विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई होणारच'; व्हायरल अहवालांबाबत BMC ने दिले स्पष्टीकरण)

दादर टीटीकडे जाणारी वाहने स्टीलमन जंक्शन वरून उजवीकडे वळण घेऊन नंतर रानडे रोड, पानेरी जंक्शन आणि नंतर एनसी केळकर रोड, कोतवाल गार्डन या बाजूने पुढे जाऊन त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जातील. दरम्यान, मुंबईतील पहिली अंडर ग्राउंड मेट्रो लाईन-3 बांधणाऱ्या MMRCL साठी राज्य सरकारने 250 कोटींचा निधी मंजूर केला आहे.