Ganeshotsav 2020: BMC कडून घरगुती गणेशोत्सव साठी नियमावली जारी; श्रींच्या आगमन, विर्सजनाला केवळ 5 जणांना मुभा
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जारी केल्यानंतर आता घरगुती गणेशोत्सवासाठीदेखील नियमावली जारी करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण मिळवत असलेल्या बीएमसीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी गाईडलाईंस जारी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जारी केल्यानंतर आता घरगुती गणेशोत्सवासाठीदेखील नियमावली जारी करण्यात आली आहे. दरम्यान घरामध्ये गणेश मूर्ती आणण्याच्या आणि विर्सजन करण्याच्या विधींमध्ये कमाल 5 लोकांचाच समावेश असावा असं सांगण्यात आले आहे. तसेच गणेश मूर्तीची उंची 2 फूट असावी असे देखील सूचवण्यात आले आहे.
यंदा गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट दिवशी आहे. त्यादिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा केली जाईल मात्र यंदा कोरोना संकट पाहता नागरिकांनी हा सण साधेपणाने साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई मध्ये कोविड 19 ची स्थिती पाहता नियमांचे उल्लंघन करणार्यांवर Epidemic Act 1897, the Disaster Management Act, 2005 आणि इंडियन पीनल कोड नुसार उचित कारवाई केली जाईल असा इशारा देखील पालिकेकडून देण्यात आला आहे.
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी फेस शिल्ड, मास्कचा वापर, हॅन्ड सॅनिटाईझरचा वापर करावा. भव्य मिरवणूका टाळाव्यात. सजावटीसाठी तसेच गणेशमूर्तींसाठी देखील इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. Ganeshotsav 2020: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी दक्षिण मुंबई मध्ये 5 अतिरिक्त कृत्रिम तलावांची सोय; पहा कोठे असतील 'ही' तलावं.
सोसायटीमधून घरगुती गणपतींच्या मिरवणूका टाळा. शक्य असेल तर कृत्रिम तलावांमध्येच गणेश मूर्तींचं विसर्जन करा. लहान मुलांनी, वयोवृद्धांनी सार्वजनिक मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी जाणं टाळा. तसेच शक्य असल्यास यंदा गणेशमूर्ती मार्बल किंवा धातूची ठेवून त्याची पूजा आणि घरच्या घरीच विसर्जन करण्याकडे भर द्यावा असं आवाहन देखील करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये यंदा अनेक मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तीच्या उंचीमध्ये बदल करत लहान मूर्त्या आणण्याला पाठिंबा दर्शवला आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा यासह गिरगाव, चिंचपोकळी भागातील गणेशोत्सव मंडळांनीदेखील यंदा साधेपणाने गणेशोत्सव करत कोविड19 साठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.