पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत मुंबई ठरले देशात सर्वात सुरक्षित; दिल्लीतील पाणी अशुद्ध, जाणून घ्या संपूर्ण यादी
तर राजधानी दिल्ली (Delhi) हे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सर्वात असुरक्षित ठरले आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांनी, शनिवारी दिल्लीसह देशभरातील 20 राज्यांमधून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांचा बहुप्रतीक्षित तपास अहवाल जाहीर केला. यामध्ये थेट नळातून घरामध्ये येणाऱ्या पाण्याच्या बाबतीत मुंबई (Mumbai) सर्वात सुरक्षित आहे. तर राजधानी दिल्ली (Delhi) हे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सर्वात असुरक्षित ठरले आहे. म्हणजेच दिल्लीसमोर दोन महत्वाच्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत, एक म्हणजे प्रदूषण आणि दुसरे म्हणजे पिण्याचे शुद्ध पाणी. सरकारने जाहीर केलेल्या या यादीमध्ये मुंबई नंतर, हैद्राबाद दुसर्या क्रमांकावर तर भुवनेश्वर तिसर्या क्रमांकावर आहे.
नुकतेच देशातील 21 मोठ्या शहरांचा पिण्याचा पाण्याचा अहवाल समोर आला आहे. शुद्ध पाण्याच्या यादीत मुंबईने अव्वल स्थान पटकावले आहे. इथल्या पाण्याने सर्व निकषांची पूर्तता केली आहे. त्याचबरोबर दिल्ली या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. सरकारने पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणीच्या 10 मानदंडांवर ही स्थाने निश्चित केली आहेत. या यादीमध्ये रांची आणि रायपूर अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्याखालोखाल अमरावती सहाव्या क्रमांकावर, त्यानंतर सिमला, चंडीगड, त्रिवेंद्रम, पटना. पुढे भोपाळ 11 व्या क्रमांकावर आहे. गुवाहाटीला 12 वे स्थान मिळाले. त्यानंतर बेंगळुरू, गांधी नगर, लखनऊ, जम्मू, जयपूर, देहरादूनचा क्रमांक लागतो. नंतर चेन्नई, कोलकाता 20 व्या स्थानावर आला असून, देशाची राजधानी दिल्ली या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.
(हेही वाचा: ड्रायव्हिंगसाठी जगातील 100 शहरांमध्ये 'मुंबई' सर्वात वाईट, तर कोलकाता शेवटून तिसरे- Report)
नळाद्वारे पिण्याच्या पाण्यात येणारे रासायनिक आणि विषारी घटक, बॅक्टेरिया तसेच विविध प्रकारच्या विद्रव्य अशुद्धी तपासण्यासाठी बीआयएसने हा अभ्यास केला आहे. यामध्ये बीआयएसच्या अभ्यासानुसार, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या तीन शहरांमधील नमुने, 10 पैकी 11 मानकांवर अपयशी ठरले. त्याचप्रमाणे, 17 राज्याच्या राजधानीतून घेतलेले नमुनेही पिण्याच्या पाण्यासाठी तयार केलेले मानक- 'इंडियन स्टँडर्ड (आयएस) - 10500: 2012' पूर्ण करण्यात अपयशी ठरले.