मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकात ट्रेन आणि ट्रकची जोरदार धडक, चालकाला अटक

या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवतहानी झालेली नाही.

कांदिवली स्थानकात ट्रेन आणि ट्रकमध्ये धडक (Photo Credits-Twitter)

मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकात वांद्रे टर्मिनस येथून अमृतसरकडे निघालेल्या पश्चिम एक्सप्रेसच्या ट्रेन आणि ट्रकमध्ये जोरदार धडक बसल्याची घटना सोमवारी घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवतहानी झालेली नाही. परंतु ट्रक चालकाला या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याचे वाहन ही जप्त केले आहे. रेल्वे प्रशासनाने असे म्हटले आहे की, संबंधित विभागिय कर्मचाऱ्यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई सुद्धा केली जात आहे. ज्युनिअर प्रशासकिय ग्रेड स्तराच्या अधिकाऱ्यांच्या द्वारे या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर ट्रेन जवळजवळ 45 मिनिटे घटनास्थळी थांबूनच होती.

पश्चिम रेल्वे मार्गावरील या दुर्घटनेमुळे बाहेरील आणि  लोकल ट्रेनवर कोणताही परिणाम झालेला नाही. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एक ट्र्क कंदिवली रेल्वे स्थानकाच्या येथून चिंचोळ्या मार्गाने दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी ट्रक रेल्वे रुळांवर अडकून पडल्याने पाठून येणाऱ्या  मेल एक्सप्रेसची त्याला धडक बसली. सध्या या प्रकरणी ट्रक चालकाची चुकी असल्याचे म्हटले जात आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी केली जात आहे.(कोरोना व्हायरसच्या काळात पश्चिम रेल्वेचे 1,770 कोटी रुपयांचे नुकसान)

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी असे म्हटले आहे की, ही घटना सोमवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली आहे.  या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दुर्घटनेनंतर काही काळ तेथेच थांबून होती. परंतु त्यानंतर ती पाठवण्यात आली.