Mumbai: अभिनेत्री पुन्हा एकदा झाली 'तसल्या' कॉलची शिकार; व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलरकडून लैंगिक छळ

ही व्यक्ती 20 वर्षांची तरुण आहे व आपल्याकडून चूक झाल्याचे त्याने सांगितले

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

डिजिटलायझेशनच्या युगात लोकांचे आयुष्य जितके सुकर झाले आहेत, तितकेच त्याचे तोटेही वाढले आहेत. व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) माध्यमातून याआधी अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे, आता अजून एका घटनेने त्यामध्ये भर पडली आहे. मुंबई (Mumbai) मधील चित्रपट अभिनेत्री आणि स्व-संरक्षण प्रशिक्षक (Self-Defence Trainer) असलेल्या तरुणीने, एका व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलरकडून (WhatsApp Video Caller) आपला लैंगिक छळ (Sexual Harassment) झाल्याची तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गेल्या वर्षीही या अभिनेत्रीला असाच अनुभव आला असल्याचे तिने सांगितले.

मात्र त्यावेळी पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी घेतला आणि अद्यापही आपण त्या खटल्याच्या स्थितीबाबत अंधारात असल्याचे तिने सांगितले. आता या 32 वर्षीय अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, तिला अज्ञात नंबरवरून वारंवार व्हॉट्सअॅप कॉल येत होते मात्र तिने कधीच त्याला उत्तर दिले नाही. शुक्रवारी, यूके देशाचा कोड असलेल्या नंबरवरून दोनदा तिला व्हिडिओ कॉल आला मात्र तिने तो घेतला नाही.

मात्र तिसऱ्यांदा चुकून तो कॉल घेतला व समोर दिसलेली घटना पाहून तिला धक्काच बसला. त्या व्हिडिओ कॉलवर समोरची व्यक्ती चक्क हस्तमैथुन करीत असल्याचे तिला दिसले. ते पाहून तिने आपला चेहरा दिसून नये म्हणून ताबडतोब फोनचा कॅमेरा झाला व त्यानंतर पुरावा म्हणून तिने काही स्क्रीनशॉट घेतले. त्यानंतर त्या व्यक्तीने तिला मेसेजस पाठवायला सुरुवात केली आणि तिला तिच्या नावानेही संबोधित केले. यानंतर अभिनेत्रीने मुंबई पोलिसांना टॅग करत त्या व्यक्तीचे मेसेजेस व व्हिडीओचे स्क्रीनशॉट ट्विट करायला सुरूवात केली. (हेही वाचा: रिक्षा प्रवासादरम्यान विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करणार्‍या चालकाला Mumbai Police कडून अटक)

अभिनेत्री पुढे म्हणते, 'नंतर या व्यक्तीने माफी मागायला सुरुवात केली, कदाचित त्या गुन्हेगाराला हे समजले असेल की तो आता संकटात सापडला आहे. ही व्यक्ती 20 वर्षांची तरुण आहे व आपल्याकडून चूक झाल्याचे त्याने सांगितले. त्याने हा दावा केला की ते व्हिडिओ कॉल आणि मेसेज माझे नाव असणाऱ्या दुसऱ्या कोणासाठीतरी होते.'

आता अभिनेत्रीने आयपीसी आणि आयटी कायद्यातील तरतुदींनुसार वर्सोवा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. ही व्यक्ती मध्यरात्रीपर्यंत तिला मेसेजेस पाठवत होता. महत्वाचे म्हणजे पोलिस स्टेशनमध्येही तिला त्या मुलाची दुसऱ्या एका मुलीसोबतची अश्लील व्हिडिओ क्लिप मिळाली.