मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर वेगवेगळ्या अपघातात एकाच दिवशी 16 ठार, एकदिवसीय दुर्घटनेतील मृत्यूंची उच्चांकी नोंद
या रेल्वे मार्गावरुन दररोज साधारण 8 ते 9 प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो.
मुंबई शहर (Mumbai City) ते उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वे महामार्गावर गुरुवारी (18 जुलै 2019) वेगवेळ्या ठिकणी झालेल्या अपघातांत 16 लोकांचा मृत्यू झाला. एकदिवसीय दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या संख्येच्या नोंदीत हा आजवरचा उच्चांकी आकडा आहे. मुंबई रेल्वे (Mumbai Railway) पोलिसांनी ही माहिती शुक्रवारी (19 जुलै 2019) दिली. रेल्वे पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये 16 लोक ठार झाले. पण, त्याचसोबत 13 लोक जखमीही झाले. रेल्वे अपघातात लोक जखमी होण्याच्या घटनाही वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या.
दरम्यान, ज्या ठिकाणी रेल्वे अपघाताच्या घटणा घडल्या ती सर्व ठिकाणे मुंबई शहराच्या उपनगरांचा भाग आहे. उल्लेखनिय असे की, गुरुवारी झालेल्या एकूण रेल्वे अपघातांमद्ये ठार झालेल्या 16 प्रवाशांपैकी 7 लोक हे ठाणे उपनगरांतर्गत येणाऱ्या रेल्वे स्टेशनांवर झालेल्या अपघातात मृत्यू पावले. ठाणे रेल्वे स्टेशनांतर्गत येणारी रेल्वे स्टेशन्स ही मुंबई उपनगरांचाच भाग आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे रेल्वे स्टेशन ते डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्टेशनांदरम्यान झालेल्या अपघातात प्रत्येकी दोन अपघाती मृत्यूची नोंद झाली. तर, कुर्ला रेल्वे स्टेशनला हार्बर आणि मध्य अशा दोन मार्गांवरुन 3 अपघाती मृत्यूंची नोंद झाली. वाशी, पनवेल, मुंबई सेंट्रल, बांद्रा, बोरिवली आणि वसई रेल्वे स्टेशनांवरुन ही प्रत्येकी एका अपघाती मृत्यूची नोंद झाली. सर्व ठिकाणांहून आलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिवसभरात एकूण 16 लोकांच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली. (हेही वाचा, मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेर 22 मुजोर टॅक्सी चालकांना अटक, RPF कडून पहिल्यांदा कारवाई)
धक्कादायक म्हणजे मुंबई आणि उपनगरीय रेल्वे मार्गावरुन शहरातील सुमारे 80 टक्के लोक प्रवास करतात. या रेल्वे मार्गावरुन दररोज साधारण 8 ते 9 प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो.