MSRTC Workers' Union Protest Threat: एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांचा 9 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा; CM Eknath Shinde यांनी दिले 'हे' निर्देश
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगत, या मागण्यांमुळे होणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालायची यासंदर्भात उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
MSRTC Workers' Union Protest Threat: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या कामगार संघटनांनी 9 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नविन बसेस घेण्याबाबत सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगत, या मागण्यांमुळे होणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालायची यासंदर्भात उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठक तातडीने घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात शासनाला सादर करण्याचेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे आदी विविध मागण्यांसदर्भात सविस्तर चर्चा यावेळी झाली. (हेही वाचा: Shravanat ST Sange Tirthatan: एसटी महामंडळातर्फे 'श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ उपक्रमाचे आयोजन; सवलतीच्या दरात राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी)
दरम्यान, येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील 13 संघटनांनी संप पुकारला आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यांनी 2021 मध्येही असेच आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. परंतु त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, असा आरोप करत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी संपाची हाक पुकारली आहे.