एसटीची 'विठाई' बससेवा; पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलभक्तांचा प्रवास होईल सुलभ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विठाई ही नवीन बससेवा सुरु केली आहे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी 'विठाई' ही नवीन बससेवा सुरु केली आहे. यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना चांगला फायदा होणार आहे. उद्या सोमवार (24/12/2018) दिवशी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात या बससेवेचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर बससेवेला सुरुवात होईल.
आषाढी एकादशीनिमित्त दहा लाखांहून अधिक विठ्ठलभक्त दर्शनासाठी पंढरपूरात दाखल होतात. हे भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात. या दरम्यान पंढरपूरात दाखल होण्यासाठी एसटीच्या नियमित बसेससह जादा बस उपलब्ध करुन दिल्या जातात. पण अनेकदा त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या भाविकांच्या सोयीसाठी एसी महामंडळाने ही बससेवा सुरु केली आहे.
सुरुवातीला दहा बस वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील. यात 2x2 पूश बॅक सीट असतील. एका बसमध्ये 42 प्रवाशांची बसण्याची व्यवस्था होईल. तसंच भाविकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही एसटीकडून करण्याचा प्रयत्न आहे. प्रवास, राहणे व जेवण या तिन्ही गोष्टी यात समाविष्ट असल्याने भाविकांची चांगली सोय होईल. या सुविधा भाविकांना अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2018 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

