Monsoon 2022: मान्सून आगमन लांबणीवर? पाऊस रेंगाळला गोव्याच्या सीमेवर, महाराष्ट्रात दाखल होण्याबाबत आता नवा मुहूर्त, घ्या जाणून
हा अंदाज कासीचा चुकला असून आता 12 ते 13 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यात आहे, असा नवा मुहूर्त वर्तविण्यात आला आहे
मान्सून (Monsoon 2022) यंदा लवकर येणार म्हणून वेळेआधीच मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या आणि तसा अंदाज वर्तवणारे सर्वच जण जमिनीवर आले आहेत. यंदा मान्सून महाराष्ट्रात काहीसा लवकरच दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज कासीचा चुकला असून आता 12 ते 13 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यात आहे, असा नवा मुहूर्त वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर (Monsoon 2022 Arrival Likely Delayed in Maharashtra) पडला की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मान्सून गोव्याच्या सीमेवरच रेंगाळल्याचेही बोलले जात आहे. खास करुन कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात मान्सून जरा अधिकच रेंगाळताना दिसतो आहे.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या उन्हाच्या झळांनी काहीली वाढवली आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम आहे. या तापलेल्या वातावरणात दिलासा देण्यासाठी मान्सूनपूर्व सरींचा शिडकाव येत्या एक-दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा, Monsoon 2022: आता फक्त काहीच तास उरले; पुढच्या दोन दिवसांमध्ये मान्सून कोकणात, उर्वरीत महाराष्ट्रात कधी?)
नेहमीच्या तुलनेत यंदा उन्हाचे चटके काहीसे अधिकच जाणवले. त्यामुळे मनुष्य, प्राणी-पक्षी आणि धरतीही जणू 'पड रं पाण्या.... पड रं पाण्या... कर पाणी पाणी..' हे गीतच गात होते. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे नाही म्हणायला काहीसा दिलासा मिळाला. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. ही शक्याता ऐकूनही बळीराजा आणि अनेकांना आनंद झाला. सर्वांनी मान्सूनसाठी ढगांकडे डोळे लावले खरे. पण मान्सूनने हुलकावणी दिली ती दिलीच. खरे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे मान्सून 7 जून म्हणजे आजच दाखल होणे अपेक्षीत होते. मात्र तसे कोणतेच चिन्ह सध्या तरी दिसत नाही. परिणामी आता नव्या शक्यतेनुसार 12 ते 13 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असे अपेक्षीत आहे.