राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक 2019 च्या रिंगणात उतरणार नाही? मनसे नेत्याच्या माहितीने चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष (Maharashtra Navnirman Sena) आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर येत आहे.
येत्या काही दिवसात आगामी लोकसभा निवडणूकांच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना - भाजपाच्या युतीचं आणि कॉंग्रेस - एनसीपी सह महाआघाडीचं गणित जमलं आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष (Maharashtra Navnirman Sena) आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर येत आहे. मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याने ही माहिती दिली असून अद्याप पक्षाकडून किंवा राज ठाकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अनेक पक्षांच्या नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर मनसे महाआघाडीमध्ये सहभागी होणार? अशा चर्चांनाही ऊत आला होता. मात्र अखेर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसे लोकसभेच्या रिंगणात उतरणार नसल्याने अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळणार आहे.
मनसे नेत्याने दिलेल्या वृत्तानुसार, मनसे मोदी सरकारवर टीका करणार. लोकसभेमध्ये मनसे थेट निवडणूकीच्या रिंगणात उतरणार नसली तरीही विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली ताकद दाखवणार आहे.