मुंबईच्या महापौरांना मनसे कडून खास गिफ्ट, महिलांचा मान ठेवण्याचे देणार धडे
याचाच एक भाग म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी महाडेश्वर यांना महिलांचा मान ठेवण्याचे धडे मिळावेत यासाठी शुक्रवारी ‘शिवछत्रपतींची स्त्री - नीती’ हे पुस्तक भेट दिले.
मुंबई: महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) हे अलीकडे आपल्या बेताल वक्तव्यामुळे आणि कथित गैरवर्तणुकीमुळे सारखेच वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे सांताक्रूझ (Santacruz) मध्ये त्यांनी एका महिलेचा हात पिरगळण्याचा आरोप लगवण्यात आला होता. हा मुद्दा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उचलून धरला होता तसेच यामुळे महाडेश्वर यांनी राजीनामा द्यावा व त्यांच्यावर करावी करण्यात यावी अशीही मागणी होत होती. अशातच मनसे (MNS) च्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापौर बंगल्यावर मोर्चा नेला होता, यावेळी महाडेश्वर यांना महिलांचा मान ठेवण्याचे धडे मिळावेत यासाठी शुक्रवारी ‘शिवछत्रपतींची स्त्री - नीती’ हे पुस्तक भेट देण्यात आले. तसेच झाल्याप्रकरणी महापौरांनी जाहीर माफी मागावी व आत्मपरीक्षण करून या चुका टाळाव्यात असेही कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे.
सांताक्रुझ येथे पटेल नगरमध्ये विजेचा झटका बसून सोमवारी एका मायलेकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाहणीसाठी आलेल्या महापौरांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्या वेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये महापौरांनी स्थानिक महिलेचा हात पिरगळून तिला धमकावल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. यानंतर महाडेश्वर यांच्यावर सर्व राजकीय पक्षांनी झोड घेतली होती. पण काही वेळाने महाडेश्वर यांनी या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देताना आपल्याला सुद्धा आई- बहिण आहे, महिलांशी कसे वागावे हे आम्हाला सुद्धा कळते असं म्हणत त्यांनी आपल्या वरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. 'जनाची नाही तर मनाजी लाज बाळगून पदाचा तत्काळ राजीनामा द्या', मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर टीका
दरम्यान, याबाबत काही दिवसांपूर्वी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुद्धा महाडेश्वर यांना 'जनाची नाही तर मनाजी लाज बाळगून पदाचा तत्काळ राजीनामा द्या असे सुनावले होते. यापूर्वीही मुंबईत जोरदार पावसामुळे जेव्हा ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडत होत्या तेव्हा महाडेश्वर यांनी मुंबई तुंबलीच नाही असा दावा केला होता, ज्यावर मनसेने त्यांना जाड भिंगाचा चष्मा भेट देऊन उपहासात्मक संताप व्यक्त केला होता.