Marathi Bhasha Din 2021: मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी न मिळाल्याने मनसे आक्रमक; 'कार्यक्रम होणारच' अमेय खोपकर यांचा इशारा

27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला मुंबई पालिकेने परवानगी न दिल्याने पालिकेने मनसे आक्रमक झाली आहे.

Ameya Khopkar | (File Image)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Sena) मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din) मुंबईत (Mumbai) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला मुंबई पालिकेने परवानगी न दिल्याने पालिकेने मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी 'कार्यक्रम होणारच, जी कारवाई करायची आहे ती करा,' असा इशाराही दिला आहे. राज्यात सध्या सरकारमधील एका मंत्र्याला वेगळा न्याय आणि काटेकोरपणे नियम पाळणाऱ्यांना वेगळा न्याय असं चित्र आहे, असंही ते म्हणाले.

"आम्ही सर्व नियम पाळून कार्यक्रम करणार होतो. यासाठी आम्ही पालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली. मराठी भाषा दिन पाळण्यासाठी देखील जर सरकार विरोध करणार असेल, तर धन्य आहे हे सरकार. उद्याचा कार्यक्रम होणारच, जी कारवाई करायची ती करा" असं जाहीर आव्हान अमेय खोपकर यांनी केलं आहे. सरकारने हवी ती कारवाई माझ्यावर करावी. त्यासाठी मी तयार आहे, असंही ते म्हणाले.

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या निमित्ताने मनसेकडून  'मराठी स्वाक्षरी मोहिम' आयोजित करण्यात आली होती. याचे आवाहन खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यासाठी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्र करत मराठी भाषा दिनानिमित्त एक प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं होतं. (हे ही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Park: शिवाजी पार्क मैदान नुतनीकरणावरुन शिवसेना- मनसे आमने सामनाने, आदित्य ठाकरे गंभीर, राज ठाकरे यांचे आयुक्तांना पत्र)

त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरु करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखाशाखांमध्ये फलक लावलेले असतील, त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने सुरुवात केल्यास आपण खूप मोठा पल्ला गाठू शकतो."