MLC Polls 2021: महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीत 6 पैकी 4 जागा बिनविरोध; अकोला-वाशीम-बुलडाणा आणि नागपूर जागेवर चुरस रंगणार

पण दोन जागांवर राजकीय चुरस बघायला मिळेल.

Maharashtra Vidhan Parishad Election 2020 | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक (MLC Polls)  जाहीर झाल्यानंतर राजकीय रणधुमाळी सुरू झाली होती. आज या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. अशामध्ये राजकीय वाटाघाटी करत 6 पैकी 4 जागांवर तडजोडी करत तेथील निवडणूका बिनविरोध करण्यात आल्या आहेत. पण दोन जागांवर राजकीय चुरस बघायला मिळेल. 10 डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे. Maharashtra Vidhan Parishad Elections: कोल्हापूर च्या जागेवर सतेज पाटील यांची बिनविरोध निवड; अमल महाडिक यांनी अर्ज घेतला मागे .

आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यास मुदत असल्याने मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारच्या प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली आहे. मुंबई मध्ये सुनिल शिंदे आणि राजहंस सिंह, कोल्हापूर मध्ये सतेज पाटील तर धुळे नंदुरबार मध्ये अमरिश पटेल यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. पण आता नागपूर मध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस आणि अकोला-वाशीम-बुलडाणा मध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा लढत होत आहे.

नागपूरमध्ये भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांच्या सामना रंगणार आहे. अकोला-वाशीम-बुलढाणा मतदारसंघात भाजपाकडून वसंत खंडलवाल आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजेरिया हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. आमदार गोपीकिश बाजेरिया हे आतापर्यंत तीन वेळा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत.

रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांचा कार्यकाळ संपत असल्याने रिक्त जागांवर निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत.