Mumbai - Pune Expressway Viral Video: गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा खुलासा 'चौघांनाही अटक, बंदूक दाखवणारे 'ते' शिवसैनिक नव्हेत'

चौघेही मुंबईतील राहणारे असून त्यांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Shambhuraj Desai | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील ((Mumbai - Pune Expressway) व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओतील (Mumbai - Pune Expressway Viral Video) बंदुक दाखवणारे 'ते' तरुण शिवसैनिक (Shiv Sainik) नव्हेत, असा खुलासा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई ( Shambhuraj Desai) यांनी केला आहे. वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करताना काही तरुण कारच्या खिडकीतून बंदूक दाखवत मार्ग काढत असल्याचे व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ एमआयएम खासदार एम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी ट्विटरवर शेअर केला होता. व्हायरल झालेला व्हिडिओ त्यातील तरुण आणि शिवसैनिक या सर्वाचा संबंध इतकाच की केवळ व्हिडिओत दिसणाऱ्या कारवर शिवसेना पक्षाचे स्टिकर होते. हे स्टिकर पाहून कारमध्ये असणारे लोकही शिवसैनिकच असावेत असे अनेकांना वाटले. परिणामी शिवसेनेवर अनेकांनी टीकास्त्र सोडले.

या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. दरम्यान, गृहमंत्री शंभूराज देसाई यांचा खुलासा आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांपैकी चौघेही शिवसैनिक नाहीत. त्यातील एक पिस्तूल बनावट आहे. दुसऱ्या पिस्तुलाची चौकशी सुरु आहे. (हेही वाचा, Mumbai - Pune Expressway Viral Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर थरार, बंदूक दाखवून ओव्हरटेक, गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हायरल)

Mumbai - Pune Expressway Viral Video | (Photo Credits: Video Screenshot)

दरम्यान, विकास गजानन कांबळे, विजय प्रकाश, सिताराम मिश्रा, राम मनोज यादव या चौघांना या प्रकरणात आर्म ऍक्ट 325 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. चौघेही मुंबईतील राहणारे असून त्यांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इम्तियाज जलील यांनी व्हिडिओ शेअर करत आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, व्हिडिओत दिसणारे दृष्य हे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील आहे. कारवर शिवसेनेचे स्टीकर आहे. हे स्टीकरच सर्व काही सांगत आहे. कारमधील शिवसैनिक आपल्या कारने प्रवास करत असताना आपल्या रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करत होते. दरम्यान, हेच ट्विट मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत या अधर्माची दखल घेतली जाऊल का? असा सवालही जलील यांनी विचारला आहे.