Milind Narvekar Wish Amit Shah: मिलींद नार्वेकर यांच्याकडून अमित शाह यांना शुभेच्छा, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा

ही चर्चा रंगली आहे नार्वेकर यांनी केलेल्या ट्विटमुळे. केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह (Amit Shah) यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Milind Narvekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उजवा हात समजले जाणारे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा रंगली आहे नार्वेकर यांनी केलेल्या ट्विटमुळे. केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह (Amit Shah) यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यातील बंद दाराआडची बोलणी आणि त्यानंतर तुटलेली भाजप-शिवसेना युती आणि दोन्ही पक्षांमध्ये आलेला दुरावा या पार्श्वभूमीवर नार्वेकरांचे ट्विट आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अर्थात, या ट्विटमध्ये शुभेच्छा वगळता विशेष असे काहीच नाही. तरीही राजकीय वर्तुळात त्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. हा विजय झाल्यानंतर काही तासांमध्येच नार्वेकर यांनी भाजपच्या शक्तीशाली केंद्रीय नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. निमित्त वाढदिवसाचे असले तरी, शिवसेना-भाजप वादाच्या पार्श्वभूमीवर त्याकडे सूचकपणे पाहिले जात आहेत. (हेही वाचा, Bharat Jodo Yatra in Maharashtra: 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात 7 नोव्हेंबरपासून; उद्धव ठाकरे, शरद पवार सहभागी होण्याची शक्यता)

ट्विट

मिलिंद नार्वेकर यांनी इंग्रजी भाषेत केलेल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "माननीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! सर्वशक्तिमान देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो". मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. पाठिमागील अनेक वर्षे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे पाहायला मिळाले आहेत. असे असले तरी त्यांच्याबद्दल प्रसारमाध्यमं आणि राजकीय वर्तुळात अनेकदा वेगवेगळ्या चर्चा होत असतात. खास करुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यावर या चर्चेला अधिक उधान आले. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर सुरु झालेल्या चर्चेचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता अमित शाह यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे हा धुरळा उडाला आहे.