Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

म्हाडा (MHADA) कडून यंदा मुंबईत (Mumbai) घरांसाठी तब्बल चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 4082 घरांसाठी सुमारे 1 लाख 20 हजार 144 पात्र अर्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता या अर्जदारांचे लक्ष सोडतीकडे लागले आहे. संगणकीय पद्धतीने केल्या जाणार्‍या सोडतीची तारीख आणि स्थळ अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान यंदा 2 वेळेस या सोडतीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने सोडतीच्या तारखेमध्ये बदल करण्यात आले आहे. नवी तारीख म्हाडा लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

म्हाडा कडून अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन, येथे घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये 1 लाख 45 हजार 849 अर्जांपैकी अंतिमतः 1 लाख 20 हजार 144 अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मंडळातर्फे तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती 'म्हाडा' कडून देण्यात आली आहे. Mumbai MHADA Housing Lottery Result 2023: मुंबई म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा निकाल ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात? 

म्हाडा च्या मुंबई तील घरांच्या विक्री करिता 4082 सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1947 घरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता 22 हजार 472 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील 843 घरांसाठी 28 हजार 862 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. या ठिकाणी 415 घरे आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांसाठी 60 हजार 522 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगाव या योजनेकरिता आहेत. या ठिकाणी 416 घरे आहेत. तर मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांसाठी 8395 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत. उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2068 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोळी कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता असल्याची माहिती म्हाडा कडून देण्यात आली आहे.