MHADA Lottery 2021: आता सर्वसामन्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; लवकरच लागणार म्हाडाची 7,500 घरांची बंपर लॉटरी

राज्यात ‘म्हाडा’ लोकांचे हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत आहे. आता कोरोनानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध होता आहे

म्हाडा (Photo Credits-Facebook)

मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्वत: च्या मालकीचे घर असावे हे जवळजवळ प्रत्येकाचेच स्वप्न असते. राज्यात ‘म्हाडा’ लोकांचे हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत आहे. आता कोरोनानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध होता आहे. ज्यांना म्हाडाच्या घराच्या सोडतीची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे, कारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करू शकेल. लवकरच म्हाडाच्या घरांची लॉटरी असून यामध्ये 7,500 जणांना घर मिळू शकणार आहे. ही माहिती गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि निम्न उत्पन्न गट (LIG) आणि मध्यमवर्गीय (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) अशा अर्जदारांना म्हाडा स्वतःचे घर घेण्याची सुवर्णसंधी देत ​​आहे. म्हाडाच्या घरांची किंमत प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा कमी आहे. म्हणूनच हजारो लोक म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करतात. म्हाडा लवकरच नव्या घरांची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. जितेंद्र अव्हाड यांनी ही जाहिरात मार्चमध्ये प्रकाशित होईल असे सांगितले. (हेही वाचा: MNS: ठाणे, वसई-विरारमध्ये भाजप-शिवसेनेला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश)

या सोडतीमध्ये कुठे व किती घरे असतील?

ठिकाण - वर्तकनगर, ठाणे - एकूण घरे– 67

ठिकाण - ठाणे शहर - विखुरलेली एकूण घरे– 821

ठिकाण - घणसोली, नवी मुंबई - एकूण घरे- 40

ठिकाण - भंडार्ली, ठाणे-ग्रामीण - एकूण घरे- 1771

ठिकाण - गोठेघर - ठाणे ग्रामीण – एकूण घरे- 1185

ठिकाण - खोणी-कल्याण ग्रामीण – एकूण घरे- 2016

ठिकाण - वाळीव-वसई – एकूण घरे- 43

महाराष्ट्र कोकण बोर्डाचे प्रमुख नितीन महाजन यांच्या मते घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एकूण घरांची माहिती लवकरच शेअर केली जाईल. मागील लॉटरीमध्ये न गेलेली काही घरे यावर्षी म्हाडाच्या सोडतीत सामील होतील अशीही शक्यता आहे.