MHADA Konkan Board Lottery 2021 Winners List: म्हाडा कोकण विभागीय मंडळातील सोडतीतील यशस्वी आणि प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची इथे पहा यादी

मीरा रोड, विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग येथील म्हाडाच्या आज जाहीर झालेल्या 8984 घरांसाठी 2,46,650 अर्ज आले होते.

Representational Image (Photo Credit: Pixabay)
म्हाडा कोकण विभागीय मंडळातील (MHADA Konkan Board) सोडतीतील यशस्वी आणि प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमारास ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहामध्ये सोडतीचा कार्यक्रम पार पडला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील हा निकाल मर्यादित उपस्थित लोकांमध्ये पार पडला पण म्हाडाने या निकालाचं थेट प्रक्षेपण वेबसाईटवरून प्रसिद्ध केले होते. आता ही प्रक्रिया पार पडली असून www.mhada.gov.in वर या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांच्याकडून यशस्वी (Winner List) आणि प्रतिक्षा यादीतील (Wait List) अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 6195 घरं, अल्प उत्पन्न गटासाठी 1775, मध्यम उत्पन्न गटासाठी 234 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 1 अशी एकूण 8205 घरांचा समावेश आहे. आणि 700 उरलेल्या घरांचा असा एकूण 8984 घरांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही घरं मीरा रोड, विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग येथील आहेत. 8984 घरांसाठी 2,46,650 अर्ज आले होते.  MHADA Konkan Board Lottery 2021 Results Live Streaming: कोकण विभागातील म्हाडा घरांची सोडत सुरू; इथे पहा थेट प्रक्षेपण.

काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील 5% घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असेल अशी माहिती दिली होती. त्यामुळे येत्या काही काळात महाराष्ट्रात बांधली  जाणारी म्हाडाची घरं सर्वसामान्यांच्या आवाकात येतील अशी घरं बांधण्याच्या विचारात आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.