वाढत्या वीज बिलाची MERC ने घेतली दाखल; मीटर आणि बिल यांची होणार चौकशी
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ग्राहकांच्या वीज दराबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल गेली असून, याबाबत तपास करण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग द्विसदस्यीय समिती नेमणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई उपनगरातील वीज दराबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. साधारण येणाऱ्या बिलापेक्षा अचानक जास्तीचे बिल यायला सुरुवात झाली असे ग्राहकांचे म्हणणे होते. याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा (Maharashtra Electricity Regulatory Commission) कडून ग्राहकांच्या तक्रारींची गंभीर दखल गेली असून, तपास करण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग द्विसदस्यीय समिती नेमणार आहे.
मुंबई उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (Adani Electricity Mumbai Ltd) ही कंपनी वीज पुरवठा करते. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने कंपनीकडे या तक्रारींबाबत काही मुलभूत प्रश्नांची विचारणा केली होती, मात्र कंपनीकडून याबाबत कोणतही उत्तर न मिळाल्याने आयोगाने हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वीज आयोगाने अदानी पुरवत असलेला क्षेत्रात 1 सप्टेंबर 2018 पासून 0.24 इतकी वीज दरवाढ मंजूर केली आहे. मात्र अदानीकडून याहीपेक्षा जास्त दराची बिले ग्राहकांना पाठवण्यात येत आहेत. तसेच मीटरप्रमाणे बिल पाठवण्याऐवजी सरासरी बिल पाठवले गेले असल्याची तक्रारही ग्राहकांनी केली होती. या गोष्टींचा विचार करत मंगळवारी आयोगाने कंपनीकडे काही गोष्टींची माहिती मागवली होती. यावर कंपनीकडून किती ग्राहकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत याची आकडेवारीही पुरवण्यात आली नाही. त्यामुळे आता आयोग स्वतः याबाबतीत तपास करणार आहे.
काही ठिकाणी बिल 50 टक्के तर काही ठिकाणी 100 टाकी जास्त यायला सुरुवात झाल्यानंतर, सरकारने यात लक्ष घालावे अशी मागणी मनसे आणि कॉंग्रेस कडून करण्यात येत होती. यावर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.